संगमेश्वरमधील करजुव्यात मध्यरात्रीनंतर तहसीलदारांची धाड; वाळूचे दोन ढिगारे सापडले

संगमेश्वर तालुक्यातील करजुवेत सुरु असलेल्या वाळूमाफियांच्या वाळू तस्करीबाबतचे वृत्त दैनिक सामनाने प्रसिध्द करताच बुधवारी मध्यरात्री दीड वाजता तहसीलदारांनी सुतारवाडी आणि वातवाडी येथ धाड टाकली. या धाडीत या परिसरात वाळूचे दोन ढिगारे सापडले आहेत. बातमीच्या धसक्यानंतर सुतारवाडी आणि वातवाडीतील वाळूउपसा बंद आहे.

संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथे सुतारवाडी आणि वातवाडी येथे मोठ्या प्रमाणात वाळूउपसा सुरु होता. या वाळूउपशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील वाळूमाफियांची संख्या वाढली होती. हे वृत्त दैनिक सामनाने प्रसिध्द करताच प्रशासनाला जाग आली आहे. मध्यरात्री दीड वाजता संगमेश्वरच्या तहसीलदारांनी सुतारवाडी आणि वातवाडी येथे धाड टाकली. या धाडीमध्ये वाळूचे ढिगारे सापडले आहेत.

ग्रामस्थांचा रस्ता रोकोचा इशारा
माखजन, आरवली, कासे, करजुवे मार्गावर अनधिकृतरित्या उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे बिनबोभाट सुरु असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी याविरोधात रस्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते परशुराम पवार यांनी निवेदन दिले आहे. वाळू वाहतूकीविरोधात प्रशासन आता काय कारवाई करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या तहसीलदारांना सक्त सूचना
करजुवेमध्ये सुरू असलेल्या वाळूउपशाची जिल्हाधिकारी एम. देवेदर सिंह यांनी गंभीर दखल घेतली आहे. बुधवारी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्येही करजुवे येथील वाळूउपशाच्या मुद्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. यापुढे असे प्रकार इथे चालता कामा नयेत अशा सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिल्या आहेत.