तिसरी बेगम चित्रपटातून ‘जय श्रीराम’ वगळणार, हायकोर्टात सुटला तिढा; निर्मात्याने मान्य केली सूचना

तिसरी बेगम चित्रपटातून ‘जय श्रीराम’ची घोषणा वगळली जाणार आहे. तशी हमी निर्मात्याने उच्च न्यायालयात दिली आहे. या बदल्यात अन्य डायलॉग म्हटला जाणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या चित्रपटातील मुख्य पात्र मुस्लिम आहे. या पात्रावर हिंदू हल्ला करतात. त्यावेळी तो जय श्रीरामच्या घोषणा देतो. या दृश्यावर सीबीएफसी बोर्डाने आक्षेप घेतला. जय श्रीरामची घोषणा या दृश्यातून वगळा, अन्यथा चित्रपटाला ए प्रमाणपत्र देण्यात येईल, असे बोर्डाने निर्मात्याला सांगितले. त्याविरोधात निर्मात्याने याचिका दाखल केली.

न्या. रियाज छागला यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या मुद्दय़ावर उभयतांनी एकत्र बसून तोडगा काढावा, अशी सूचना न्यायालयाने केली. त्यानुसार बोर्डाने निर्मात्याला पर्यायी वाक्य दिले. ते निर्मात्याने मान्य केले. या चित्रपटात ट्रिपल तलाकविषयी एक दृश्य आहे. त्यावरही बोर्डाने हरकत नोंदवली होती. सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल तलाक बेकायदा ठरवला आहे, असे बोर्डाने निर्मात्याच्या निदर्शनास आणले. या दृश्यावेळी तशी सूचना दाखवण्यात येईल, असे निर्मात्याने स्पष्ट केले. चित्रपटातील दृश्यांसंदर्भात असलेला तिढा सुटल्याने न्या. छागला यांनी ही याचिका निकाली काढली.

तुम्हे तुम्हारे भगवान का वास्ता

जय श्रीरामच्या ऐवजी तुम्हे तुम्हारे भगवान का वास्ता, असा डायलॉग मुख्य पात्राने म्हणावा, अशी सूचना बोर्डाने निर्मात्याला केली. ही सूचना निर्मात्याने मान्य केली.