
पालघर जिल्ह्यातील नायगाव येथे धक्कादायक घटना घडली. येथे एका 24 वर्षीय प्रियकराने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या 17 वर्षीय प्रेयसीने जीवन संपवले. मुलीने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिल्याने मुलाने टोकाचे पाऊल उचलले. प्रियकराच्या या निर्णयामुळे अपराधीपणाच्या भावनेने प्रेयसीनेही देखील गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरापासून या दोघांचे प्रेमसंबंध होते. नायगाव पूर्वेकडील कोल्ही गावातील आशा नगर येथील रहिवासी असलेला सुरज (बदललेले नाव) एका खाजगी कंपनीत काम करत होता. तर मुलगी ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी होती. गेल्या काही आठवड्यांपासून तो तिच्यावर तिच्या पालकांचे घर सोडून त्याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहण्यासाठी दबाव आणत होता. मात्र ती तिच्या कुटुंबासोबत राहण्याच्या तिच्या निर्णयावर ठाम राहिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ही तरुणी तिचा प्रियकर सुरजच्या घरी गेली होती. मात्र तिथे गेल्यावर या प्रकरणावरून पुन्हा वाद सुरू झाला. यावेळी सुरजने जर तू माझं एकलं नाहीस तर मी आपले जीवन संपवेल अशी धमकी दिली. प्रियकर आपल्याला भावनेच्या शाब्दिक खेळात अडकवत असल्याचे समजून ती तेथून निघून गेली. आपली प्रेयसी आपल्याला सोडून गेल्यामुळे सुरज नाराज झाला होता आणि रागाच्या भरात त्याने टोकाचे पाऊल उचलले. त्याने शनिवारी रात्री घरातच गळफास घेत आपले जीवन संपवले. रविवारी सकाळी सुरज दार उघडत नसल्याने शेजारच्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. तेव्हा या घटनेचा खुलासा झाला.
प्रियकराने आत्महत्या केल्याचे समजताच प्रेयसीला मानसिक धक्का बसला. आपल्या प्रियकराच्या मृत्यूला आपण स्वत: जबाबदार असल्याचे तिला वाटू लागले. यावेळी तिच्या कुटुंबाने तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती सत्य स्विकारण्यास तयार नव्हती. याचंदरम्यान रविवारी संध्याकाळी तिची आई नातेवाईकांशी घडलेल्या प्रकराबाबत बोलण्यासाठी घराबाहेर पडली. याच संधीचा फायदा घेत मुलीने घरातच गळफास घेत जीवन संपवले. या घटनेमुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास करत असल्याचे नायगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेंद्र पाटील म्हणाले.