माझ्या आजीच्या बँक खात्यात खूप पैसे आहेत…, शालेय विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करत 80 लाखांवर डल्ला

हरयाणाच्या गुरूग्राममध्ये फसवणुकीची धक्कादायक घटना घडली आहे. एका 20 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीची फसवणूक करून तिच्या आजीच्या खात्यातून तब्बल 80 लाख रुपये लंपास केले आहे. या मुलाने पैसे मिळवण्यासाठी पीडितेला तिचे वैयक्तिक फोटो मॉर्फ करून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. हे प्रकरण गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होते. याप्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमित कटारिया असे त्या आरोपीचे नाव आहे. पीडितेने आपल्या शाळेतील एका मित्राला तिच्या आजीच्या खात्यात असलेल्या पैशाबाबात सांगितले होते. त्यामुळे ही बातमी संपूर्ण शाळेत वाऱ्यासारखी पसरली. 10 वीच्या एका विद्यार्थ्याने याबाबत आपल्या मोठ्या भावाला आणि त्याच्या काही मित्रांना सांगितले. एवढी मोठी रक्कम एका आजीच्या अकाऊंटवर कशी असू शकेल? असे म्हणत काहींनी याकडे दुर्लक्ष केले.

दरम्यान, यापैकीच सुमित (20) नावाच्या तरुणाने आणि त्याच्या काही मित्रांनी आजीच्या पैशांवर नजर ठेवली. यासाठी त्याने सोशल मी़डियावरून आधी पीडितेसोबत मैत्री केली. यानंतर त्याने सोशल मीडियाचा वापर करून तिचे काही फोटो, व्हिडिओ मिळवले. हे फोटो मॉर्फ करून पीडितेचा फोन नंबर मिळवला. मग हळूहळू त्याने पीडितेला तिचे मॉर्फ फोटो पाठवून पैशांची मागणी केली. जर पैसे दिले नाही, तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी त्याने दिली.

पीडित मुलीने दबावाखाली येऊन आजीच्या खात्यातून पैसे पाठवायला सुरुवात केली. आजीला ऑनलाईन खाते वापरणे माहित नसल्यामुळे तिला याबाबत कल्पनाही नव्हती. हे प्रकरण बरेच महिने सुरू होते. पीडितेने पैसे पाठवून आजीच्या खात्यातील जवळपास 80 लाख रुपये आरोपीच्या खात्यात ट्रान्सफर केले होते. त्यामुळे तिने हळूहळू पैसे पाठवणे बंद केले होते. याच रागात येऊन आरोपी सुमितचा मित्र नवीनने पीडितेला शाळेत जाऊन धमकवायला सुरुवात केली. याप्रकणाबाबत शाळेच्या शिक्षकांना समजल्यावर त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली.

शिक्षकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना ताब्यात घेतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 75 वर्षीय आजींच्या खात्यात जमिनीच्या व्यवहारातून 80 लाख रूपये आले होते, अशी माहिती आजींनी स्वत: पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत आहेत.