नागपूरातील समृद्धी महामार्गावर रविवारी भीषण अपघात झाला. एक्स्प्रेस वेवर यू-टर्न घेत असताना कारचे नियंत्रण सुटले. आणि कार एका ट्रकवर आदळली. या अपघातात एका इंजिनिअरचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिलाष चंद्रकांत ढोणे (31) असे या मृत व्यक्तीचे नाव असून ते वर्ध्यातील रामनगरचे रहिवासी होते. अभिलाष आणि त्यांची पत्नी वर्धाच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात झाला. समृद्धी मार्गावर यू टर्न घेत असताना अभिलाष यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी एका ट्रकवर आदळली. अभिलाष गाडी नियंत्रणात न आणू शकल्यामुळे ढोणे दाम्पत्य गंभीर जखमी झाले.
दरम्यान त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी अभिलाष ढोणे यांना मृत घोषित केले. त्यांच्या पत्नीवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले आहे.