विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत काही भामट्यांनी हात धुऊन घेतला. निवडणूक तपासणी पथकाची हुबेहूब नक्कल करून बोगस पथकाने एका व्यावसायिकाची 25 लाख 50 हजारांची रोकड लांबविली. हा प्रकार मंगळवारी पहाटे पुणे-बंगळुरू महामार्गालगत तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ घडला. या प्रकरणी शाहूपुरी कोल्हापूर येथील व्यापारी सुभाष हारणे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
व्यापारी सुभाष हारणे हे यात्रेत पाळणे लावण्याचा व्यवसाय करतात. व्यवसायाची रक्कम घेऊन ते कारमधून तावडे हॉटेल येथे आले. 25 ते 30 वयोगटांतील पाच तरुणांनी हारणे यांची कार अडवली. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू असल्याचे हारणे यांना सांगितले आणि कारची झडती सुरू केली. आचारसंहिता काळात एवढी रक्कम तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, असे सांगून हारणे यांना कारवाईची भीती घातली. त्यांना आपल्या कारमध्ये बसवून ते सरनोबतवाडीच्या दिशेने गेले. त्या वेळी 25 लाख 50 हजार रुपये ठेवलेली बॅग बोगस अधिकाऱयांच्या हाती लागली. रोकड आणि मोबाइल घेऊन बोगस अधिकारी फरार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हारणे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.