बुमराने केली अश्विनच्या विक्रमाशी बरोबरी

‘टीम इंडिया’चा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने कसोटी क्रिकेटच्या गोलंदाजी क्रमवारीत 904 रेटिंग गुणांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकत्याच निवृत्त झालेल्या रविचंद्रन अश्विनच्या विक्रमशी बरोबरी केली. अश्विनने आपल्या कारकीर्दीत 904 गुणांपर्यंत सर्वोत्तम झेप घेतली होती. बुमराने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये आतापर्यंत एकूण 29 बळी टिपले असून, तो गोलंदाजी क्रमवारीत 48 रेटिंग गुणफरकाने अव्वल स्थानावर आहे.

या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा 856 रेटिंगसह दुसऱ्या, तर जोश हेजलवुड 852 रेटिंग गुणांसह तिसऱया क्रमांकावर आहे. पॅट कमिन्स 822 रेटिंगसह चौथ्या, तर रविचंद्रन अश्विन 789 रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे. याचबरोबर मॅट हेन्री (782 रेटिंग) सहाव्या, नॅथन लायन (770 रेटिंग) सातव्या, प्रभात जयसूर्या (768 रेटिंग) आठव्या, नोमान अली (759 रेटिंग) नवव्या व रवींद्र जाडेजा (755 रेटिंग) दहाव्या क्रमांकावर आहे.

जैसवालची घसरण

कसोटीच्या फलंदाजी क्रमवारीत इंग्लंडचा जो रूट अव्वल स्थानी कायम असून, हिंदुस्थानच्या यशस्वी जैसवालची चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. पर्थ कसोटीत झंझावाती शतक ठोकल्यानंतर गेल्या चार डावात जैसवालला विशेष काहीही करता आलेले नाही. मागील कसोटीत 151 धावांची खेळी करणारा ऑस्ट्रेलियाचा ट्रव्हिस हेड चौथ्या स्थानावर आलाय. गॅबा कसोटीतील शतकवीर स्टीव्हन स्मिथने दहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.