मुंबईत टीम इंडियाच्या मिरवणुकीसाठी गुजरातची बस; विरोधक आक्रमक, ‘बेस्ट’ची करून दिली आठवण

विश्वविजेत्या टीम इंडियाची मुंबईत जंगी मिरवणूक काढली जाणार आहे. यासाठी तयारीही करण्यात आली आहे. मात्र मिरवणुकीसाठी गुजरातहून बस मागविण्यात आल्याने विरोधक आक्रमक झाले असून महाराष्ट्र सरकार गुजरातधार्जिणे असल्याची खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

मुंबईत होणाऱ्या मिरवणुकीसाठी गुजरातहून बस आणून एक प्रकारे महाराष्ट्राचा अवमान करणअयात आला आहे, असे नाना पटोले म्हणाले. यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही यावर भाष्य करत ‘बेस्ट’ची आठवण करून दिली.

टीम इंडियाच्या खेळाडूला संपूर्ण देशाने पाठिंबा दिला, त्यांनी चांगला खेळ केला आणि त्यामुळे आपण ही स्पर्धा जिंकू शकलो याचा सार्थ अभिमान आहे. पण हिंदुस्थानचा संघ मुंबईत येत असेल आणि मिरवणूक काढली जात असेल तर मुंबईची बेस्ट बस वापरायला हवी होती. बेस्ट बस आणि मुंबई अशी एक वेगळी ओळख असून मिरवणुकीसाठी बेस्टची बस वापरली असतील तर आम्हाला आनंद झाला असता, असे रोहित पवार म्हणाले.

जगज्जेतेपदाचा दुष्काळ संपला

शनिवारी थरारक संघर्षात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टीम इंडियाने आपल्या जगज्जेतेपदांचा दुष्काळ संपवताना 13 वर्षांनंतर जगज्जेतेपद तर 17 वर्षांनंतर टी-20 वर्ल्ड कपचे दुसऱ्यांदा जगज्जेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला. 17 वर्षांपूर्वी आयसीसी वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानवर साखळीतच बाद होण्याची नामुष्की ओढावली होती. हा पराभव कोट्यवधी हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींच्या जिव्हारी लागला होता. या पराभवाच्या सहा महिन्यांनंतरच टीम इंडियाने टी-20 क्रिकेटचे पहिलेवहिले जेतेपद अत्यंत रोमहर्षक लढतीनंतर काबीज करत हिंदुस्थानी चाहत्यांना जगज्जेतेपदाची अनोखी भेट दिली होती.