मिरवणुकीसाठी गुजरातची बस कशासाठी? मुंबईकरांचा संतप्त सवाल

जगज्जेत्या हिंदुस्थानी संघाच्या विजयी मिरवणुकीतून मुंबईची शान असलेल्या बेस्ट बसला डावलण्यात आले. नरीमन पॉइंट ते वानखेडेपर्यंतच्या मिरवणुकीत रोहित सेना खुल्या बसवर स्वार झाली. पण ही बस गुजरातहून मागवली होती. बीसीसीआयच्या या गुजरातप्रेमावर मुंबईकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याच वेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही यावर सडपून टीका केली.

मिरवणुकीसाठी गुजरातहून डबलडेकर खुली बस मागवण्यात आल्याची बातमी समोर येताच त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियातून मुंबईकरांनी आपला संताप व्यक्त केला. हिंदुस्थानी संघाची विजयी मिरवणूक मुंबईत काढण्यात आली. मग त्यासाठी गुजरातमधून बस का मागवण्यात आली. मुंबईची शान, ओळख आणि वैभव असलेल्या बेस्टच्या ताफ्यातील बसची निवड का करण्यात आली नाही. मुंबईकरांच्या लाडक्या बेस्टची तुम्हाला अॅलर्जी आहे का, असा प्रश्नांचा भडीमार मुंबईकरांनी केला आहे. 2011मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाची मिरवणूक बेस्टच्या खुल्या बसमधून काढण्यात आली होती. त्याची आठवणही मुंबईकरांनी बीसीसीआयला करून दिली.

मिंधे स्वतःचं सरकारही गुजरातला हलवतील – आदित्य ठाकरे

महाराष्ट्रात गुजरातसमोर लोटांगण घातलेले सरकार आहे. मिंधे स्वतःचं सरकारही गुजरातला हलवतील, असा सणसणीत टोला लगावत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तोफ डागली. जगज्जेत्या संघाचे आम्ही अभिनंदन करत आहोत, पण मुद्दा इतकाच आहे की त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्रात, मुंबईत गुजरातच्या बस कशासाठी, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

…तर आणखी आनंद झाला असता – रोहित पवार

बेस्ट बस आणि मुंबई अशी एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे या मिरवणुकीसाठी बेस्टची बस वापरली गेली असती, तर आम्हाला आणखी आनंद झाला असता. बीसीसीआयने गुजरातहून बस आणलीच, पण त्यांनी बेस्टच्या बसची निवड करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली.

महाराष्ट्र सरकार गुजरातधार्जिणे – पटोले

महाराष्ट्र सरकार गुजरातधार्जिणे आहे. मुंबईतील मिरवणुकीसाठी गुजरातहून बस आणून एक प्रकारे महाराष्ट्राचा अवमान करण्यात आला आहे, अशी तोफ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डागली.