पुण्यात अब्रूचा पालापाचोळा झाल्यामुळे अस्थिर झालेला हिंदुस्थानी संघ आता वानखेडे स्टेडियमवर आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी उतरणार आहे. दोन आठवडय़ांपूर्वी न्यूझीलंडचा धुव्वा उडवण्याची फटाकेबाजी करणाऱया हिंदुस्थान संघालाच कसोटी मालिकेत पराभवाचे जिव्हारी लागणारे फटके सहन करावे लागलेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या महामोहिमेवर जाण्यापूर्वी संघाचे मनोधैर्य उंचावणारी कामगिरी करण्याची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर पडलीय. मालिकेत हरलेल्या हिंदुस्थानी संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईकर क्रिकेटप्रेमीही मोठय़ा संख्येने गर्दी करणार आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी संघ वानखेडेवर आपल्या चाहत्यांना दिवाळीची फटकेबाज भेट देईल अशी आशा आहे. उम्मीद पर दुनिया कायम आहे. वानखेडेवर तमाम हिंदुस्थानींना दिवाळीचा विजयी धमाका अनुभवायला मिळेल, असा विश्वास आहे.
हार के आगे जीत नाहीच मिळाली
हिंदुस्थानने गेल्या दशकभरात अनेकदा मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतरही बाजी मारली होती. त्यामुळे बंगळुरू कसोटी गमावल्यानंतरही हिंदुस्थान मालिकेत पुनरागमन करील, असे छातीठोकपणे बोलले जात होते. पण या मालिकेत हिंदुस्थानला ‘हार के बाद जीत’ मिळालीच नाही. आपण दुसरी कसोटीही हरलो आणि मालिकाही गमावली. यापूर्वी 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध हिंदुस्थानने मायदेशात अखेरची कसोटी मालिका गमावली होती. तसेच 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया व 2021, 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी गमावूनसुद्धा हिंदुस्थानने कमबॅक करत मालिकेत सरशी मिळवली होती, पण पुण्यात ते शक्य झाले नाही.
हिंदुस्थानी फलंदाज फिरकी खेळण्यात सर्वोत्तमच – गंभीर
गेल्या दोन कसोटींत झालेल्या पराभवांमुळे हिंदुस्थानी फलंदाज फिरकीला खेळण्यात सर्वोत्तम असल्याचा लौकिक इतिहासजमा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यामते हिंदुस्थानी फलंदाज आजही फिरकी खेळण्यात सक्षम आहेत. सर्वोत्तम आहेत. फक्त टी-20 क्रिकेटचे प्रस्थ वाढल्यामुळे बचावात्मक खेळ काहीसा मागे पडला असल्याचे गौतम गंभीर यांनी मान्य केले. हिंदुस्थानी फलंदाजांना लवकर बाद करण्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना यश लाभले आहे. त्यांच्या कामगिरीचे काwतुक करायला हवे. आमचे खेळाडूही खूप मेहनत करत आहेत आणि वानखेडेवर हिंदुस्थानी फलंदाजांची ती मेहनत दिसेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निकाल महत्त्वाचा असतो.
एजाझ पुनरावृत्ती करणार
2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वानखेडेवर झालेल्या कसोटी सामन्यात फिरकीवीर एजाझ पटेलने डावात 10 विकेट मिळवले होते. आता तीन वर्षांनी एजाझ पुन्हा वानखेडेवर परतला आहे. तसेच रचिन रवींद्र व मिचेल सॅण्टनर या डावखुऱया खेळाडूंवर किवी संघाची भिस्त आहे. लॅथम, डेवॉन कॉन्वे यांनीही संघासाठी आतापर्यंत मोलाचे योगदान दिले आहे.
मुंबईकरांचे मुंबईकरांवर लक्ष
वानखेडेवर मुंबईचे रोहित शर्मा, यशस्वी जैसवाल व सरफराज खान हे तिन्ही खेळाडू खेळताना दिसतील. आपल्या घरच्या वानखेडेवर खेळताना या तिघांचाही खेळ उंचावेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या मुंबईच्या त्रिकुटाकडून चाहत्यांना दमदार फटकेबाजी पाहायला मिळू शकते. रोहितची बॅटही गेल्या काही काळापासून थंड आहे. या लढतीतही रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा व वॉशिंग्टन सुंदर यांचे फिरकी त्रिकूट संघात कायम असेल, असे समजते.
वानखेडेच्या आखाडय़ावरही फिरकीची दहशत
वानखेडेच्या खेळपट्टीवर नेहमीच फिरकीपटूंची दहशत असते. यावेळीही फिरकीचीच दादागिरी चालणार, असे समजले आहे. त्यामुळे दोन्ही संघ किमान तीन-तीन फिरकीवीरांसह वानखेडेवर उतरतील. तसेच सध्याचे कसोटी सामने पाहाता हा सामनाही पाचव्या दिवसांपर्यंत लांबणे कठीणच आहे. वानखेडेवर खेळपट्टी दुसऱया दिवसापासूनच आखाडा होते. त्यामुळे वानखेडेवर फलंदाजांना आपला सर्वोत्तम खेळ करणे आव्हानात्मक ठरणार आहे. त्यातच मुंबईचे तापमान चांगलेच चटके देत आहे. त्यामुळे खेळाडूंचाच चांगलाच घामटा निघणार, हेसुद्धा निश्चित आहे.
बुमराला विश्रांती ?
न्यूझीलंडविरुद्धची मालिका फिरकीनेच गाजवली आहे. गेल्या दोन कसोटींत वेगवान गोलंदाज हजेरी लावण्यापुरतेच होते. दोन्ही संघात जोरदार कामगिरी केली ती फिरकीवीरांनी. वानखेडेवरही उभय संघ फिरकीलाच प्राधान्य देण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिंदुस्थानी संघ व्यवस्थापनाने आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी फ्रेश होण्यासाठी जसप्रीत बुमराला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून कळले आहे. बुमराऐवजी मोहम्मद सिराज हिंदुस्थानी संघाची वेगवान गोलंदाजी सांभाळेल, असे संकेतही मिळाले आहेत. बुमराला या मालिकेत फार चमकदार कामगिरीही करता आली नाही. कारण ही मालिका फिरकीवीरांचीच होती. मात्र बुमराशिवाय हिंदुस्थानी संघाची गोलंदाजी आणखी कमकुवत होईल, अशी भीतीही वर्तवण्यात आली आहे. असे असले तरी बुमरा आज सराव करतानाही दिसला नाही. त्यामुळे त्याला विश्रांती दिल्याचेही बोलले गेले आहे.
हिंदुस्थान ः रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमरा, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा.
न्यूझीलंड ः टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल, मार्क चॅपमन, डेव्हन कॉन्वे, जेकब टफी, मॅट हेन्री, डॅरेल मिचेल, विल्यम ओ’रोर्क, एजाझ पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सॅण्टनर, इश सोधी, टिम साऊदी, विल यंग.