न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमावल्यामुळे हिंदुस्थानचे सलग तिसऱयांदा जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीत पोहोचणे आता सोपे राहिलेले नाही. या पराभवामुळे अंतिम फेरीच्या शर्यतीत हिंदुस्थान, ऑस्ट्रेलियासह श्रीलंका आणि न्यूझीलंड यांचीही एण्ट्री झाली आहे. त्यामुळे पुणे कसोटीतल्या पराभवाने हिंदुस्थानच्या अंतिम फेरीच्या आशांना जबर धक्का बसला आहे.
बंगळुरू कसोटीत हिंदुस्थानचा 46 धावांत खुर्दा पाडून न्यूझीलंडने 36 वर्षांनंतर हिंदुस्थानी भूमीवर आपला पहिला कसोटी विजय नोंदविला होता. बंगळुरूनंतर पुण्यातील पराभवाने हिंदुस्थानच्या पायाखालची जमीनच सरकल्याचा भास झाला आहे. गेल्या 12 वर्षांत हिंदुस्थानने सलग 18 कसोटी मालिका जिंकल्या होत्या, पण या मालिकेला न्यूझीलंडने रोखले. मात्र या पराभवाने हिंदुस्थानचा लॉर्डस्चा प्रवास अधिक खडतर केला आहे. सध्या हिंदुस्थान पहिल्या क्रमांकावर कायम असला तरी पहिल्या दोन संघांत कायम राहण्यासाठी पुढील सहापैकी चार कसोटींत विजय मिळवणे क्रमप्राप्त आहे. जर मुंबईत हिंदुस्थानने न्यूझीलंडला धक्का नाही दिला तर हिंदुस्थानच्या लॉर्डस् प्रवासाला जोरदार धक्का बसू शकतो. पुढे ऑस्ट्रेलियाचा दौराही हिंदुस्थानला अव्वल संघांच्या शर्यतीतून बाहेर फेकू शकतो. लॉर्डस्वर कोणते दोन संघ खेळणार याचा फैसला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत होणार असला तरी त्याचा पाया न्यूझीलंडने हिंदुस्थानात रचला आहे. हिंदुस्थानला शर्यतीत राहायचे असेल तर पुन्हा विजयाच्या ट्रकवर धावावेच लागणार आहे. हिंदुस्थानसाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. एक पराभवही हिंदुस्थानचे आव्हान खिळखिळे करू शकतो याची जाणीव कर्णधार रोहित शर्मासह सर्वांना असायला हवी.