बीसीसीआयच्या ईमेल हल्ल्याने पीसीबी हादरली; पीसीबी आयसीसीकडे स्पष्टीकरण मागणार

गेल्या अनेक महिन्यांपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनासाठी जिवाचे रान करत असलेले पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ईमेल हल्ल्याने अक्षरशः हादरले आहे. हिंदुस्थानचा क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही, असा मेल बीसीसीआयने आयसीसीला पाठवल्यानंतर पीसीबीच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. त्यामुळे त्यांनी आयसीसीकडे स्पष्टीकरण मागण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत.

हिंदुस्थानी संघाला पाकिस्तानात खेळण्याची परवानगी पेंद्र सरकार देणार नाही, याची पीसीबीला आधीपासूनच कल्पना होती, पण तरीही पीसीबी आपल्या परीने बीसीसीआयचे मन वळविण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले आहे. हिंदुस्थानचा संघ पाकिस्तानात खेळणार नसल्याचे सांगितले, पण हायब्रिड मॉडेलबाबत कसलीही माहिती न दिल्यामुळे पीसीबी चिडले असून ते आयसीसीकडे स्पष्टीकरण मागणार आहेत.

हिंदुस्थानच्या लढती दुबईत?

आयसीसीने आपल्या पत्रात हायब्रिड मॉडेल आयोजनाबाबत काहीही सांगितलेले नाही. गेल्या वर्षी आशिया चषकादरम्यानही अशीच स्थिती निर्माण झाली होती आणि तेव्हा हिंदुस्थानचे सामने श्रीलंकेत खेळवले गेले होते. आताही हिंदुस्थानच्या सर्व लढती दुबईत खेळविल्या जाऊ शकतात. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिंदुस्थानच्या लढती दुबईत खेळविण्याचा हायब्रिड पर्यायही पीसीबीने आयसीसीला पाठविला आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्व अव्वल संघ खेळणार असल्याचे प्रायोजक आणि ब्रॉडकास्टर्सना सांगितले होते. पण हिंदुस्थानच्या माघारीमुळे पीसीबीवर आर्थिक संकट ओढावले आहे.