मेलबर्न कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 184 धावांनी पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाचे जगातिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणे आता अवघड झाले आहे. जर टीम इंडियाला WTC फायनलमध्ये पोहचायचे असेल, तर पाचव्या कसोटी सामन्यात कोणत्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा लागणार आहे. त्याच बरोबर श्रीलंकेच्या विजयही टीम इंडियासाठी गरजेचा आहे.
बॉर्डर-गावस्कर करंडकातील शेवटचा सामना 3 जानेवारी पासून सिडनी क्रिकेट मैदनावर सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी प्रयत्नशील असेल. परंतु टीम इंडियाला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. टीम इंडियाला जर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचायचे असेल, तर ऑस्ट्रेलियाला कोणत्याही परिस्थितीमध्ये पराभूत करावे लागणार आहे. त्याच बरोबर श्रीलंकेच्या विजयासाठी देवाकडे साकडे घालावे लागणार आहे. कारण श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेत श्रीलंकेने 2-0 अशा फरकाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर, टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहचू शकते. पण जर सिडनी कसोटीमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला किंवा सामना अनिर्णित सुटला, तर टीम इंडिया WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर फेकली जाईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा फायनलचा थरार 11 ते 15 जून या दरम्यान क्रिकेटची पंढरी लॉर्ड्समध्ये रंगणार आहे.