हिंदुस्थानी महिला चॅम्पियन्सच्या थाटात अंतिम फेरीत, उपांत्य फेरीतही जपानवर मात

गतविजेत्या हिंदुस्थानी महिलांनी चॅम्पियन्सला साजेसा खेळ करीत आशियाई महिला हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक दिली. यजमान संघाने उपांत्य लढतीत जपानचे कडवे आव्हान 2-0 गोलफरकाने मोडून काढले. आता जेतेपदाच्या लढतीत हिंदुस्थानसमोर बलाढय़ चीनचे आव्हान असेल.

हिंदुस्थान-जपानदरम्यानची उपांत्य लढत अतिशय चुरशीची झाली. 15-15 मिनिटांच्या तीन क्वॉर्टरनंतरही गोलशून्य बरोबरीची काsंडी फुटू शकली नाही. दरम्यानच्या काळात उभय संघांनी सावध खेळ करताना काही वेळा एकमेकांवर कुरघोडी करण्याचाही प्रयत्न केला, मात्र अखेरच्या 15 मिनिटांतील दबाव हाताळण्यात जपानी महिलांना अपयश आले. अखेरच्या क्वॉर्टरला प्रारंभ होताच तिसऱ्या मिनिटाला (48व्या मिनिटाला) हिंदुस्थानला महत्त्वपूर्ण पेनल्टी कॉर्नर मिळाला. नवनीत काwरने या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करीत हिंदुस्थानचे खाते उघडले. या गोलमुळे आणखी दबावात आल्याने जपानी खेळाडू सैरभैर झाले. याचाच फायदा उठवीत लालरेम्सियामीने 56 व्या मिनिटाला मैदानी गोल करीत  हिंदुस्थानी आघाडी 2-0ने वाढविली. मग याच आघाडीच्या जोरावर हिंदुस्थानने विजयावर शिक्कामोर्तब केले. तीन वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या हिंदुस्थानी संघाने पाचव्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

आशियाई महिला हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी, चीनची मलेशियावर मात

पहिल्या उपांत्य लढतीत चीनने मलेशियाचा 3-1 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. चीनकडून डेंग क्युचँगने दहाव्या मिनिटाला गोल करीत चीनचे खाते उघडले. त्यानंतर फॅन युंक्सिया हिने सतराव्या मिनिटाला, तर तन जिंगजहानने तेविसाव्या मिनिटाला गोल केले. मलेशियाकडून खैरूनिसाने एकमेव गोल केला. याचबरोबर दक्षिण कोरियाने पाचव्या स्थानासाठी झालेल्या लढतीत थायलंडला 3-0 असे हरवले.