India Cricket Schedule 2024-25 : तब्बल 8 वर्षांनी Team India जाणार ‘या’ देशाच्या दौऱ्यावर, वाचा संपूर्ण वेळापत्रक

टीम इंडिया सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये पार पडत असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद पटकावण्यासाठी झुंज देत आहे. टीम इंडिया जूलै ते सप्टेंबर या कालावधीत एकूण 10 कसोटी, 11 टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.

टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडिया विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. साखळी फेरीत अपराजीत राहिलेली टीम इंडिया सुपर-8 मध्ये दाखल झाली आहे. सुपर 8 मध्ये टीम इंडिया अफगानिस्तान, बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. तत्पुर्वी टीम इंडियाचे टी20 वर्ल्ड कपनंतरचे वेळापत्रक बीसीआयने जाहीर केले आहे. टीम इंडिया वर्ल्ड कप नंतर लगेच 6 जुलै ते 14 जुलै दरम्यान झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार असून सर्व सामने हरारे येथे खेळवले जाणार आहेत. 2016 नंतर टीम इंडियाचा प्रथमच झिम्बाब्वे दौरा असणार आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यानंतर टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 17 जुलै पासून टीम इंडियाचा श्रीलंका दौरा सुरू होईल. या दौऱ्यामध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी20 सामने खेळवणार आहे. त्यानंतर टीम इंडिया हिंदुस्थानात प्रामुख्याने बांग्लादेश आणि न्युझीलंड या संघांविरुद्ध भिडणार आहे. टीम इंडिया आणि बांग्लादेश यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेला सप्टेंबर महिन्यात सुरुवात होईल. या मालिकेत दोन कसोटी आणि तीन टी20 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये न्युझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर तीन कसोटी सामन्यांची मालिका टीम इंडिया खेळणार आहे.

घरच्या मैदानावर बांग्लादेश आणि न्युझीलंड या संघाविरुद्ध दोन हात केल्यानंतर टीम इंडिया नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत टीम इंडिया 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून मालिकेतील शेवटच्या सामन्याला 3 जानेवारी 2025 पासून सुरुवात होणार आहे.