मुंबई बँकेतील पूल अकाऊंटमुळे शिक्षकांच्या पगाराचा गोंधळ; 3 तारीख उलटली तरी बँकेत रक्कम जमा नाही

महिन्याची 3 तारीख उलटून गेली तरी शिक्षकांच्या बँक खात्यात पगाराची रक्कम जमा झालेली नाही. मुंबई बँकेतील पूल अकाऊंटमुळे शिक्षकांच्या पगाराला विलंब होत आहे. पगार जमा होण्यासाठी मुंबई बँकेत खाते उघडण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाला राज्य शिक्षक सेनेसह विविध शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला होता. शिक्षकांच्या रोषापुढे नमते घेत सरकारने मुंबई बँकेत खाते उघडण्याची सक्ती मागे घेतली असली तरी पडद्याआडून शिक्षकांच्या पगाराची बिले मुंबई बँकेतच जमा होणार आहेत. त्यामुळे मुंबई बँकेवर राज्य सरकारचे एवढे प्रेम का, असा सवाल शिक्षक वर्तुळातून विचारला जात आहे.

शिक्षकांचा पगार महिन्याच्या 1 तारखेला त्यांच्या बँक खात्यात जमा होत होता, मात्र आताच्या सरकारने युनियन बँकेतील शिक्षकांचे पगार मुंबई बँकेकडे वळविण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीयीकृत बँकेतील पगार जिल्हा सहकारी बँकेकडे वळविण्यास विविध शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे राज्य सरकारने निर्णयात बदल करून केवळ मुंबई बँकेत पगारासाठी खाते उघडण्याची सक्ती शिथिल केली. आता शिक्षकांना मुंबई बँकेत खाते सुरू करणे सक्तीचे नसले तरी राज्य सरकारच्या कोषागारातून जमा होणारी शिक्षकांच्या पगाराची बिले आधी मुंबई बँकेतच जमा होणार आहेत. त्यानंतर युनियन बँकेतील शिक्षकांच्या खात्यात पगाराची रक्कम वळविली जाणार आहे. या प्रक्रियेला उशीर लागणार असल्याने शिक्षकांना पगार कधीपर्यंत मिळेल हे सध्यातरी कळणे कठीण आहे.

शिक्षकांवर पगार जमा होण्यासाठी मुंबई बँकेत खाते उघडण्याची सक्ती नसली तरी राज्य सरकारच्या कोषागारातून येणारी पगाराची बिले ही सुरुवातीला मुंबई बॅकेत जमा होणार आहेत. त्यानंतर मुंबई बँक युनियन बँकेतील शिक्षकांच्या खात्यात पगाराची रक्कम वळविणार आहेत. या वेळकाढू प्रक्रियेमुळे अद्याप महिन्याची 3 तारीख उलटून गेली तरी शिक्षकांच्या बँक खात्यात पगार जमा झालेला नाही.

मुंबई बँकेत पूल अकाऊंटसाठी परवानगी कुणी दिली?

मुंबई बँकेत पूल अकाऊंटसाठी परवानगी कुणी दिली, असा सवाल राज्य शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी केला. शिक्षकांचा मुंबई बँकेला विरोध असेल तर पगारासंबंधी कोणतेही व्यवहार मुंबई बँकेतून करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. शिक्षकांच्या पगाराची प्रोसेस आता वेळकाढूपणाची झाली असून आता दर महिन्याला शिक्षकांना बँक खात्यात पगार जमा होण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.

पगाराची 1 तारीख चुकली

मुंबई बँकेमुळे शिक्षकांच्या पगाराची 1 तारीख चुकली आहे. आतापर्यंत महिन्याच्या पहिल्या तारखेला शिक्षकांच्या बँक खात्यात पगार जमा होत होता. मात्र इथून पुढे पगार कधी खात्यात जमा होईल हे सांगता येणार नाही, असे राज्य शिक्षक सेनेचे मुरलीधर मोरे यांनी सांगितले. अनेकांचे ठरावीक तारखेला गृहकर्ज, वैयक्तिक कर्जाचे हप्ते बँक खात्यातून जात असतात. मात्र आता पगार कधी जमा होईल याची शाश्वती नसल्यामुळे शिक्षकांमध्ये कर्जाचे हप्ते थकण्याची भीती निर्माण झाली आहे, असेही मोरे म्हणाले.