बारावी इंग्रजीच्या पेपरनंतर शिक्षकाला धमकी; चाकूचा धाक, पाथर्डीतील घटना; शिक्षकांचे तहसीलदारांना निवेदन

बारावी परीक्षांना काल प्रारंभ झाला असून, पहिल्याच इंग्रजीच्या पेपरदरम्यान पाथर्डी तालुक्यातील श्री वृद्धेश्वर हायस्कूल, तिसगाव येथे एका गुंडाने पर्यवेक्षकाला चाकूचा धाक दाखवून दमदाटी केल्याची घटना घडली. या घटनेचा माध्यमिक शिक्षक संघटनेने निषेध केला असून, शिक्षकांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घेण्याची मागणी केली आहे.

बारावी बोर्डाच्या पहिल्याच पेपरला शिक्षकांना धमकाविण्याचा प्रकार घडल्यामुळे शिक्षिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. पेपर संपल्यानंतर काही गुंडांनी पेपर जमा करणाऱ्या शिक्षकाची गाडी अडवून त्यांना गाडीच्या बाहेर ओढून शिवीगाळ करत चाकूचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे. या संदर्भात माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक व पाथर्डीचे पोलीस सबइन्स्पेक्टर संतोष मुटकुळे यांना निवेदन दिले.

यावर्षीच्या बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षकांची सरमिसळ पद्धतीने नियुक्ती केली आहे. त्यामुळे ओळख नसलेल्या आणि दूरच्या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती केल्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेने शासनाकडे शिक्षकांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच, अशा घटना सातत्याने घडल्यास बारावीस इयत्ता दहावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.