बारावीच्या उत्तरपत्रिका खाक; शिक्षिका, प्राचार्यावर गुन्हा

शिक्षिकेच्या घराला लागलेल्या आगीत बारावीच्या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स या विषयाच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याप्रकरणी महाविद्यालयाच्या शिक्षिका आणि प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वाणिज्य शाखेच्या संघटन व व्यवस्थापन (ओसी) या विषयाच्या उत्तरपत्रिका परीक्षक कार्यालय एम 27 यांच्यामार्फत विरारच्या उत्कर्ष विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मुग्धा लेले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या. त्यातील 175 आणि 125 उत्तरपत्रिकांचे गठे शाळेच्या शिक्षिका आणि परीक्षक नियामक प्रिया रॉड्रिक्स यांच्याकडे तपासण्यासाठी देण्यात आल्या होत्या.