शालेय मुलींवरील आत्याचार व बलात्कार प्रकरणांनी संपूर्ण देश हादरला आहे. अशा काळात तुम्ही आपल्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी पालक म्हणून काही विशेष निर्णय घेतले पाहिजे….
आपल्या मुलींना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ विषयी माहिती द्या
राज्यासह देशात लैंगिक शोषणाच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशा वेळी आपली मुलगी सुरक्षित कशी राहील याची काळजी पालकांना लागून राहिली आहे. अशावेळी पालकांनीच आपल्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी काही विशेष निर्णय घेतले पाहिजे. आपल्या मुलींना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ विषयी माहिती देणं अतिशय आवश्यक आहे. लहान मुलींनाजवळ घेवून मिठी मारणं, आणि लाड करण्यातला फरक समजावून सांगणं गरजेचं आहे. कोणत्याही प्राइवेट जागेवर कोणीही व्यक्ती स्पर्श करत असेल तर, तो स्पर्श चुकीचा आहे हे गोडीनं व त्यांच्या भाषेत समजावून सांगणं गरजेचं आहे.
आपल्या मुलींना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ विषयी कसं सांगावं?
वाईट स्पर्श समजवण्या आधी चांगल्या स्पर्शाची ओळख करून देणं. जेव्हा कोणताही व्यक्ती तुम्हाला स्पर्श करतो आणि त्यातून तुम्हाला सुरक्षित वाटतं तो स्पर्श चांगला. ही गोष्ट सांगताना त्यांना जवळ घेवून तुमचा हात पकडल्यावर मुलांना काय वाटतं हे लक्षात घ्या. जर एखाद्या व्यक्तीच्या स्पर्शाने त्रास होतोय, असं लक्षात आलं तर तातडीने त्या व्यक्तीपासून दूर रहावं हे मुलांना समजवून सांगा.
मुलांना वाईट स्पर्श सांगणं खूप अवघड होऊ शकतं. पण ज्या स्पर्शामुळे त्रास होतो त्या ‘टच’ बद्दल सांगणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी विशेषत: मुलींना त्यांचे प्राइवेट पार्ट कोणते या बद्दल माहिती सांगणं. तिथे कोणालाही हात लावू देवू नये, तसा कोणी प्रयत्न केल्यास लगेच येवून पालकांना सांगणं गरजेचं आहे. यात कोणतीही लाज बाळगू नये. संकटकाळात स्वत:चं रक्षण कसं करायचं, कोणती मदत घेणं गरजेचं आहे याबद्दल माहिती द्यावी. पालक आणि मुलांच्या नात्यात कायम मैत्रीचा संवाद असणं महत्त्वाचं आहे. आपली मुलगी किंवा मुलगा कोणतीही गोष्ट सांगण्यास घाबरू नये, असं सुरक्षित वातावरण घरात तयार करणं पालकांच कर्तव्य आहे. वेळोवेळी मुलांशी मोकळेपणानं संवाद साधून एकमेकांच्या गोष्टी शेअर करणं गरजेचं आहे.