चोरीच्या गुन्ह्यात टॅटू आर्टिस्टला अखेर वांद्रे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. उद्धव नाना निकम ऊर्फ उदय असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात दोन गुन्हे नोंद आहेत. उदयला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून ते वांद्रे परिसरात राहतात. गेल्या वर्षी त्याच्याकडे त्याची मोलकरीण काम सोडून गेली होती. त्यामुळे त्यानी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाकडे मोलकरणीबाबत विचारणा केली होती. त्यानंतर त्यांच्याकडे वनिता गायकवाड ही कामासाठी आली होती. काही तास काम केल्यानंतर ती काहीही न सांगता निघून गेली. हा प्रकार तक्रारदार यांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी घरातील दागिन्यांची तपासणी केली. नोकरीच्या पहिल्याच दिवशी तिने अकरा लाखांचे दागिने चोरी केले. याप्रकरणी तक्रारदार यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. पोलिसांनी तपास करून वनिता गायकवाडला अटक केली. तिच्या चौकशीत उदयचे नाव समोर आले. तो तिच्यासोबत घरगडी म्हणून काम करायचा. चोरी केल्यानंतर तो पळून जात असायचा. गेल्या वर्षभरापासून तो फरार होता. पोलिसांना उदयची माहिती मिळाली. त्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडून वांद्रे पोलिसांच्या स्वाधीन केले.