विविध समस्यांवर विज्ञान-संशोधनातून नावीन्यपूर्ण उपाययोजना शोधून काढणाऱया शास्त्रज्ञांना दरवर्षी ‘टाटा ट्रान्सफर्मेशन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा या पुरस्कारांसाठी 169 शास्त्रज्ञांमधून तीन शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे. या तीन विजेत्या शास्त्रज्ञांमध्ये आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. अमर्त्य मुखोपाध्याय यांचा समावेश आहे. दोन कोटी रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डिसेंबरमध्ये होणाऱया समारंभात त्यांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
टाटा सन्स आणि न्यूयॉर्क अॅपॅडमी ऑफ सायन्सेस यांच्यावतीने देण्यात येणारा ‘टाटा ट्रान्सफर्मेशन’ हा पुरस्कार यंदा ‘सीएसआयआर’चे शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉ. सी. आनंदरामकृष्णन, आयआयटी मुंबईचे प्राध्यापक अमर्त्य मुखोपाध्याय आणि बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सचे डॉ. राघवन वरदराजन यांना जाहीर झाला आहे. 18 राज्यांमधील 169 शास्त्रज्ञांचे अर्ज या पुरस्कारांसाठी आले होते. त्यातून या तिघांची निवड करण्यात आली आहे.
- पर्यावरणाचे रक्षण आणि कमी उत्पादन खर्च डोळय़ासमोर ठेवून डॉ. अमर्त्य मुखोपाध्याय यांनी विकसित केलेल्या एनए-आयन बॅटरी तंत्रज्ञान संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
- मधुमेहींमधील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) कमी असलेल्या अनेक आवश्यक पोषक घटकांचा वापर करून एक पौष्टिक पुनर्रचित तांदूळ डॉ. सी. आनंदरामकृष्णन यांनी विकसित केला आहे. त्यांच्या या संशोधनामुळे जगभरातील दोन अब्ज कुपोषितांना दिलासा मिळणार आहे.
- आरएसव्ही या श्वसनाच्या विषाणूंमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी किफायतयशीर किमतीत प्रभावी लस विकसित करण्याच्या संशोधनाची दखल घेत डॉ. वरदराजन यांना ‘टाटा ट्रान्सफर्मेशन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.