जगातील प्रसिद्ध मॅरेथॉनपैकी एक असणाऱ्या ‘टाटा मुंबई मॅरेथॉन’मध्ये धावण्यासाठी दरवर्षी जगभरातून धावपटू हजेरी लावतात. इथिओपियाच्या धावपटूंचा मॅरेथॉनमध्ये वरचष्मा पहायला मिळतो. पुरुष एलिट गटात 2023 आणि 2024 मध्ये सलग दोन वर्ष इथिओपियाच्या हेले लेमी बेरहानू याने विजेतेपद पटकावले होते. यंदा ही स्पर्धा रविवारी 19 जानेवारी रोजी पार पडणार आहे.
टाटा मुंबई मॅरेथॉनच्या पुरुष एलिट गटात 2023 आणि 2024 मध्ये बाजी मारल्यानंतर बेरहानू हा सलग तिसऱ्यांदा मुंबई मॅरेथॉन जिंकण्यास उत्सुक आहे. मागील दोन वर्षांची पुनरावृत्ती केल्यास मॅरेथॉनच्या 20 वर्षांच्या इतिहासात जेतेपदाची अनोखी हॅट्रिक साधणारा तो पहिला धावपटू असेल. 2007 आणि 2008 मध्ये केनियाच्या जॉन केलाईने यापूर्वी असा प्रयत्न केला होता. परंतु 2009 मध्ये त्याला तिसरा स्थानावर समाधान मानावे लागले. इथिओपियन महिला धावपटू मुल्लू सेबोकाने मुंबई मॅरेथॉन तीनदा जिंकली असली तरी तिसरे विजेतेपद मिळवण्यापूर्वी 2007 मध्ये ती सहभागी झाली नव्हती.
एलिट पुरुष आणि महिला या दोन्ही प्रकारातील पहिल्या तीन विजेत्यांना (फिनिशर्स) एकूण 389,524 अमेरिकन डॉलर्सच्या बक्षिसाच्या एकूण रकमेतून अनुक्रमे 50,000, 25,000 आणि 15,000 अमेरिकन डॉलर इतके बक्षीस मिळेल. एलिट गटात नवीन विक्रम रचणाऱ्या धावपटूला 15,000 डॉलरचे अतिरिक्त बक्षीस मिळेल. 2023 पासून इथिओपियाचा हेले लेमी बहांनू (2:07:32 सेकंद) आणि अॅचियालेम हेमनोटने (2:24:15 सेकंद) मॅरेथॉन रेकॉर्ड रचले आहेत. 2025 मॅरेथॉनमध्ये भाग घेणाऱ्या अकरा पुरुष आणि सहा महिला धावपटूंची वैयक्तिक कामगिरी ही सध्याच्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या स्पर्धा विक्रमापेक्षा (कोर्स रेकॉर्ड) जास्त आहे. टाटा मुंबई मॅरेथॉन ही जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यापैकीच्या मॅरेथॉनपैकी एक आहे. जागतिक स्पर्धा जपानची राजधानी टोक्योमध्ये सप्टेंबर 2025 मध्ये होणार आहे.