‘ऍक्ट्रेक’च्या कंत्राटी कर्मचाऱयांना कायमस्वरूपी करा! स्थानीय लोकाधिकार समितीची मागणी

परळच्या टाटा रुग्णालयाच्या खारघर येथील अॅक्ट्रेक रुग्णालयातील शाखेचा लवकरच विस्तार होणार आहे. रुग्णालयाच्या विस्तारानंतर नोकरभरतीमध्ये तेथील सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचारी तसेच मराठी भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी स्थानीय लोकाधिकार समिती टाटा स्मारक रुग्णालय, परळ युनिट आणि अॅक्ट्रेक खारघर युनिटच्या वतीने रुग्णालय प्रशासनाकडे करण्यात आली. त्यावर रुग्णालयाच्या प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला.

अॅक्ट्रेकमधील कंत्राटी व कायमस्वरूपी कर्मचाऱयांच्या विविध समस्यांसंदर्भात स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर यांनी अॅक्ट्रेक खारघरचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी आणि तेथील प्रशासकीय अधिकाऱयांची भेट घेतली. या भेटीत रुग्णालयाच्या विस्तारीकरणानंतर नोकरभरतीत सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी तसेच अधिकाधिक मराठी भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात यावे, कायमस्वरूपी कर्मचाऱयांना विविध सुविधा तसेच वेळेवर पदोन्नती मिळालीच पाहिजे, आदी मागण्यांवर मयेकर यांनी जोर दिला. डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी कर्मचाऱयांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

या सभेच्या आयोजनाकरिता युनिटचे अध्यक्ष तुकाराम गवळी यांच्या नेतृत्वाखाली खारघर उपशहरप्रमुख पैलास म्हात्रे, सरचिटणीस नंदकिशोर कासकर, अॅक्ट्रेक युनिटचे कार्याध्यक्ष रवींद्र पवार, सरचिटणीस मनीष डोळस, रवी पाडाळे, अभिजित जमदाडे, अजय साळवे, प्रवीण मोरजकर, राजेश कदम, नितीन गवळी, नितीन सातपुते, संदीप धामणकर, पंत्राटी कर्मचारी युनिटचे अध्यक्ष नीलेश म्हात्रे, अजय भोईर आदी उपस्थित होते.