टाटांचे क्रांतिकारी पाऊल 25 टक्के आरक्षण देणार

मोदी सरकारच्या काळात नोकऱयांसाठी प्रचंड संघर्ष कराव्या लागणाऱया वंचित, अल्पसंख्याक, दिव्यांग आणि एलजीबिटी प्लस या समुदायातील लोकांसाठी आनंदाची  बातमी. या समुदायातील लोकांना नोकऱयांमध्ये तब्बल 25 टक्के आरक्षण देण्याचे क्रांतिकारी पाऊल टाटा कंपनीने उचलले आहे.

टाटा स्टीलने काही वर्षांपूर्वी आपल्या झारखंडच्या जमशेदपूर येथील कारखान्यात एलजीबिटी + समुदायातील लोकांना कामावर घेण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे, कारखान्याच्या शॉप फ्लोअरवर या नोकऱया देण्यात आल्या होत्या. आता त्याच्याही पुढचे पाऊल उचलत वंचित, अल्पसंख्याक, दिव्यांगांनाही टाटा नोकऱया देणार आहे. येत्या काही वर्षात हे काम पूर्ण होईल, असे टाटाने स्पष्ट केले आहे.

ट्रान्सजेंडर लोकांमधील प्रतिभा हेरून त्यांना काम मिळवून देण्यासाठी टाटा स्टीलने विशेष भरती मोहीम सुरू केली. अशाप्रकारचा उपक्रम राबवणारी टाटा ही देशातील पहिली कंपनी असल्याचा दावा टाटा कंपनीच्या अधिकाऱयांनी केला आहे. कंपनीत सध्या उत्पादन, संचालन, देखभाल, उत्खनन आणि सेवा विभागांमध्ये ट्रान्सजेंडर समुदायातील 113 लोक कार्यरत आहेत. कर्मचारी कंपनीच्या नोआमुंडी, वेस्ट बोकारो, कोलकाता, खरगपूर, कलिंगा नगर आणि जमशेदपूर परिसरात कार्यरत आहेत.