कोहली हळवा, त्याला टार्गेट करा; ग्लेन मॅकग्राचा ‘माइंड गेम’

हिंदुस्थानी फलंदाजीचा ‘किंग’ विराट कोहली सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. त्यामुळे त्याला टार्गेट करा. तो हळवा आहे. तो भरकटला की हिंदुस्थानी संघ आपोआप दबावात येईल, असा ‘माइंड गेम’ सल्ला ऑस्ट्रेलियाचा माजी महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने आपल्या संघ सहकाऱयांना दिला आहे.

आपल्या अचूक आणि भेदक माऱ्याने जगातील अव्वल फलंदाजांची दांडी गूल करणाऱया मॅकग्राने बॉर्डर-गावसकर करंडकाच्या (बॉगाक) निमित्ताने आपल्या बुद्धीचा खेळ सुरू केला आहे. तो म्हणाला, फॉर्ममध्ये नसलेल्या कोहलीवर ऑस्ट्रेलिया दौऱयावर सुरुवातीला दडपण असेल. कांगारूंनी त्याला लक्ष्य केले पाहिजे. न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाकडे आता त्यांच्याविरुद्ध भरपूर स्लेजिंग करता येईल. न्यूझीलंडने टीम इंडियाला त्यांच्या देशात 3-0 फरकाने हरवल्यानंतर कोहलीवर दडपण असेल.

हिंदुस्थानचा ऑस्ट्रेलिया दौरा 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पहिला सामना पर्थमध्ये होणार आहे. टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱयावर 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून ही मालिका महत्त्वाची आहे. हिंदुस्थानला स्वबळावर अंतिम फेरी गाठण्यासाठी 5पैकी 4 सामने जिंकावे लागतील.

न्यूझीलंड मालिकेत कोहली अपयशी

कोहलीवर दबाव आणा आणि तो त्यासाठी तयार आहे की नाही ते पाहा. एक दशकाहून अधिक काळ हिंदुस्थानी फलंदाजीचा आधारस्तंभ असलेला कोहली सध्या खराब फॉर्मशी संघर्ष करतोय. या वर्षी 6 सामन्यांत त्याची सरासरी 22.72 आहे. न्यूझीलंडच्या कसोटी मालिकेतही त्याच्या फलंदाजीला सूर गवसलेला नाही. त्याच्या अपयशी खेळामुळे हिंदुस्थानला या मालिकेत दारुण पराभवाची झळ सोसावी लागली आहे. आता ऑस्ट्रेलियातील मालिकेपूर्वी हिंदुस्थानी फलंदाजीला रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्या रुपाने दुहेरी धक्का बसला आहे. यामुळे कोहलीवर फलंदाजीचे नेतृत्व करण्याचे दडपण असेल. जर तोच हलला तर हिंदुस्थानचा डाव कोसळायला फार वेळ लागणार नाही.

अतिआक्रमकता अंगलट येऊ शकते 

विराट कोहली हळवा आहे, तो आक्रमकही आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध ऑस्ट्रेलियाने अतिआक्रमकतेचा अवलंब केला तर याचा कामगिरीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असा सल्लाही मॅकग्राने आपल्या खेळाडूंना दिला आहे. तो म्हणाला, कोहलीला जास्त आक्रमकपणे लक्ष्य केल्यानेही नुकसान होऊ शकते. कोहली दबावातून बाहेर पडेल आणि खंबीरपणे उभा राहील, अशी शक्यता नाकारता येत नाही. कारण कोहली असा खेळाडू आहे की त्याच्या स्वाभिमानाला डिवचल्यास तो फिनिक्स भरारी घेऊ शकतो. कोहलीने मागील चार ऑस्ट्रेलिया दौऱयांमध्ये 54.08च्या प्रभावी सरासरीने धावा केल्या आहेत, ही आठवणही मॅकग्राने आपल्या खेळाडूंना करून दिली.