![strike](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/08/strike-696x447.jpg)
वाढवण बंदरामुळे तारापूरचे अणुऊर्जा केंद्र डेंजर झोनमध्ये आले आहे. केंद्र सरकारने अणुऊर्जा प्रकल्पासाठी 16 किलोमीटरचा इमर्जन्सी प्लॅनिंग झोन तयार केला आहे. मात्र वाढवण बंदर आणि अणुऊर्जा प्रकल्पामध्ये फक्त 11 किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पासह परिसरातील गावांची सुरक्षितता धोक्यात आली आल्याने एससी-एसटी अस्तित्व विकास समितीच्या वतीने पाच मार्ग नाका येथे आंदोलन छेडण्यात आले.
वाढवण बंदराच्या निर्मितीला अणुऊर्जा प्रकल्पाकडून ना हरकत दाखला दिल्याचे संबंधित विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत अजून कोणतीही स्पष्ट आणि ठोस लेखी हमी देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रकल्पासह प्रकल्प परिसरातील गावांवर असलेला धोका कायम आहे. अणुऊर्जा प्रकल्प आणि या परिसरातील गावांच्या सुरक्षिततेबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी समितीने आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे. वाढवण बंदर प्रकल्पाकडून वरचेवर घोषणा केल्या जात आहे. मात्र ठोस लेखी पुरावे दिले जात नसल्याने त्यांच्या या फसव्या घोषणांचा निषेध करण्यासाठी एससी-एसटी अस्तित्व विकास समितीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
विविध संघटनांचा पाठिंबा
एससी-एसटी अस्तित्व विकास समितीच्या मार्गदर्शनाखाली छेडण्यात आलेल्या या आंदोलनाला वाढवण बंदराच्या विरोध करणाऱ्या विविध संघटनांनी पाठिंबा दिला. या आंदोलनात शिवनेश उमतोल, अमोल मोरे, दिनेश जाधव, जगदीश जाधव, नागेश भोणे, वाढवण बंदरविरोधी युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष मिलिंद राऊत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते राजेश दवणे आदी सहभागी झाले होते. अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.
■ तारापूर अणुऊर्जा केंद्र आणि वाढवण बंदर यांच्यातील अंतर केवळ 11 किमी आहे. अणुऊर्जा प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने ‘इमर्जन्सी प्लॅनिंग झोन’साठी 16 किमीची मर्यादा निर्धारित केली आहे.
■ वाढवण बंदर हे या झोनमध्ये असल्याने अणुऊर्जा प्रकल्पासह परीघातील गावांच्या सुरक्षिततेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता समितीने व्यक्त केली आहे. वाढवण बंदरामुळे समुद्राच्या तापमानात वाढ होऊ शकते.
■ अणुऊर्जा प्रकल्पासाठी लागणाऱ्या थंड पाण्याच्या वापरावर याचा परिणाम होईल का, यावरही स्पष्टीकरण आवश्यक असल्याचे समितीने स्पष्ट केले. बंदरात येणाऱ्या जहाजांमुळे समुद्रात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यास प्रकल्पाच्या थंड पाण्याच्या उपशावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे.
■ बंदरामुळे समुद्राच्या परिसंस्थेतील जैवविविधतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या बदलांमुळे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षेशी संबंधित कोणतेही अभियांत्रिकी उपाय करावे लागतील का? यावर समितीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.