
>> तरंग वैद्य
गुप्तचर संस्था कशी काम करते हे सखोल पद्धतीने दर्शवणारी `सिटाडेल हनी बनी’ ही हिंदी वेबसीरिज. प्रेक्षकांची संभ्रमावस्था टाळत गुप्तहेर संस्था, हेरकथा यांचे जग उलगडणारी ही मालिका खिळवून ठेवते.
‘सिटाडेल’ या नावाची अमेरिकन गुप्तहेर कथा वर्ष 2023 मध्ये वेबसीरिज स्वरूपात आली. यात प्रियांका चोप्राने गुप्तहेर म्हणून अभिनय केला आहे. पुढे 2024 मध्ये `सिटाडेल डायना’ ह्या नावाने इटालियन वेबसीरिज आली आणि 7 नोव्हेंबर, 2024 ला `सिटाडेल हनी बनी’ नावाने हिंदी वेबसीरिज अॅमेझॉन प्राईम ह्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल झाली.
वरुण धवन हा हिंदी सिनेमातील हिरो आणि दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री समंथा या मालिकेत मुख्य भूमिकेत, म्हणजेच गुप्तहेरांच्या भूमिकेत आहेत. सुरुवात होते चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दृश्याने जिथे साहस दृश्य चित्रित केले जात असून बनी म्हणजेच वरुण `स्टंटमॅन’ म्हणून काम करतोय. पुढे समजते की, हा फक्त देखावा आहे, बनी एका गुप्तहेर संस्थेत कामाला आहे. हनी म्हणजे समंथा सिनेमात चांगल्या भूमिकेसाठी धडपडत आहे, संघर्ष करत आहे. पण यश तिच्यापासून लांब पळते आहे. परिस्थितीला कंटाळून ती एका कामात बनीला मदत करायला तयार होते. कारण तिला पैसे मिळणार असतात आणि पुढे त्या संस्थेशी जोडली जाते.
एक अरमाडा नावाचा काहीतरी प्रकार आहे, जो चांगल्या हातात आला तर जगाचे भले होईल, पण वाईट हाती गेला तर वाईट काही घडू शकेल आणि म्हणूनच या `अरमाडा’साठी दोन `एजन्सी’मध्ये संघर्ष सुरू असतो आणि त्यासाठी गुप्तहेर मुंबई, बुखारेस्ट, बेलग्रेड या ठिकाणी जाऊन एकमेकांविरुद्ध लढत असतात, कुरघोडी करत असतात. एकमेकांच्या लोकांचा बळी घेत असतात. 1992 मध्ये या संघर्षाला सुरुवात होते. पण दोन्ही संस्थेच्या हातून अरमाडा निसटतो. पुढे 2000 साली तो हनीकडे असल्याचे समजते आणि पुन्हा ठिणगी पेटते. या आठ वर्षांत सगळ्यांना हनीचा मृत्यू झाला आहे असेच वाटत असते. प्रत्यक्षात हनी जिवंत असून तिला बनीपासून एक मुलगीही असते. सात भागांच्या या मालिकेत सातव्या भागात हनी आणि बनी भेटतात आणि त्यांची मुलगी नादिया पहिल्यांदाच वडिलांना भेटते.
1992 ते 2000 अशी मागे-पुढे चालणारी कथा काहीशी विस्कळीत आहे. पटकन काय चाललेय हे समजत नाही, पण गतिशील कथेमुळे, उत्कृष्ट साहस दृश्यांच्या मदतीने आणि कलाकारांच्या कसलेल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षक कंटाळत नाही आणि एकामागे एक असे भाग बघत जातो.
भारतीय प्रेक्षकांच्या नजरेत गुप्तहेर म्हणून के. के. मेनन, मनोज बाजपेयी, अमित साधसारखे अभिनेते भरले आहेत. त्यामुळे वरुण काहीसा `बच्चा’ वाटतो. मात्र अभिनयात तो कुठेही कमी नाही. समंथा अभिनयात तर उजवी आहेच, पण साहस दृश्यात तिची मेहनत दिसून येते. मारामारी करताना शारीरिक चपळतेसोबत तिच्या चेहऱयावरील हावभाव हे दाखवून देतात की नुसते संवाद बोलताना अभिनय करायचा नसतो, ही बाब अभिनय क्षेत्रातील लोकांनी तिच्याकडून शिकावी. लहान मुलीच्या भूमिकेत काशवी मुजुमदार दिसते गोड आणि तितकाच सुंदर तिचा अभिनय. सोहम मुजुमदार, साकिब सलीम, सिकंदर खेर आपापल्या भूमिकेत योग्य. ह्या मालिकेत `हुकूम का इक्का’ आहे तो के. के. मेनन! तो असला की, सगळे लक्ष त्याच्याकडेच असा प्रभावी अभिनय त्यांनी केला आहे. त्याच्या भूमिकेची लांबी जरी कमी असली तरी त्यात त्याने अभिनयाची उंची गाठली आहे.
मुंबई, नैनिताल, हैदराबाद, शिवाय परदेशात म्हणजेच बेलग्रेड, बुखारेस्ट येथे मालिकेचे चित्रीकरण केले असून हे चित्रीकरण डोळ्यांना सुखद अनुभव देते. हाणामारीची दृश्ये, पाठलाग खूप छान पद्धतीने चित्रित केला आहे. त्यासाठी `अॅक्शन डायरेक्टर’ प्रशंसेला पात्र आहे. पहिल्या भागातील मोटरबाइक्स आणि गाडय़ांचा पाठलाग अंगावर काटा आणतो. हाणामारीत पण एक गती आहे.
हल्लीच्या वेबसीरिजप्रमाणे या वेबसीरिजलाही `फुलस्टॉप’ नाहीये. पुढचे भागही येणार अशाच पद्धतीने मालिकेचा शेवट केला आहे. विश्वा म्हणजे के. के. मेनन की त्याची प्रतिस्पर्धी झूनी…? कोण चांगले आणि कोण वाईट हे समजत नाही, तसेच हे `अरमाडा’ काय हे शेवटपर्यंत उमगत नाही. सध्यातरी पंचेचाळीस ते पंचावन्न मिनिटांचे सात भाग अॅमेझॉन प्राईमवर बघून घ्या आणि मूळ अमेरिकन हेरकथेचे हिंदीकरण आवडल्यास पुढच्या भागांची वाट बघा.
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)