गेली दोन वर्षे आपल्या अष्टपैलू खेळाने आणि ऑफस्पिनने देशांतर्गत क्रिकेट गाजवत असलेल्या मुंबईकर तनुष कोटियनसाठी अखेर हिंदुस्थानी संघाचे द्वार उघडले गेले आहेत. तडकाफडकी कसोटीतून निवृत्ती पत्करलेल्या रविचंद्रन अश्विनच्या रिक्त झालेल्या जागी त्याची उर्वरित दोन कसोटींसाठी हिंदुस्थानी संघात निवड करण्यात आली आहे. तनुषच्या समावेशामुळे रोहित शर्मा, यशस्वी जैसवाल, सरफराज खानपाठोपाठ हिंदुस्थानी संघात स्थान मिळवणारा तनुष चौथा मुंबईकर ठरला आहे. आता तो तत्काळ बॉक्सिंग डे कसोटीसाठी मेलबर्नच्या दिशेने रवाना झाला आहे. सध्या तो विजय हजारे करंडकासाठी मुंबई संघाबरोबर हैदराबाद येथे होता. मात्र आता तो ही स्पर्धा अर्धवट सोडून कसोटी क्रिकेटच्या सेवेसाठी ऑस्ट्रेलिया गाठेल.
हिंदुस्थानी संघात सध्या वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जाडेजा हे दोघे ऑफस्पिन अष्टपैलू आहेत आणि त्यांना बॅकअप मिळावा म्हणून तनुषला स्थान देण्यात आले आहे. तो बॉक्सिंग डे कसोटीत संघात स्थान मिळवण्याची शक्यता कमी असली तरी पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत पदार्पण करू शकतो. 26 वर्षीय तनुष कोटियनने गेल्या मोसमात मुंबईसाठी अफलातून कामगिरी केली होती. आतापर्यंत तो 33 प्रथम श्रेणी सामने खेळला असून यात त्याने 25.70 च्या सरासरीने 101 विकेट टिपलेत, तर 47 डावांत 41.21 च्या सरासरीने 1525 धावा ठोकल्या आहेत. नुकताच तो हिंदुस्थान ‘अ’ संघातही खेळला होता.
मुंबईला रणजी विजेता बनविताना त्याने 502 धावा आणि 29 विकेट टिपल्या होत्या. त्याच्या या कामगिरीची बीसीसीआयच्या निवड समितीने दखल घेतली आहे. गेल्या रणजी मोसमात 500 धावा आणि 25 विकेट टिपणारा तो एकमेव अष्टपैलू ठरला होता. गेल्या मोसमात रणजी विजेत्या मुंबईसाठी अनेकदा त्याने संकटमोचकाची भूमिका निभावली होती. त्याच्या याच धडाकेबाज खेळाने निवड समितीला भुरळ पाडली होती. म्हणूनच संकटात सापडलेल्या हिंदुस्थानी संघाला संकटातून बाहेर काढण्यासाठी नव्या संकटमोचकाची निवड केल्याचे क्रिकेटतज्ञांचे मत आहे.