रायगडातील 65 हजार ग्रामस्थांना टँकरचा आधार; 20 गावे, 103 वाड्यांमध्ये जल संकट

उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असून रायगडवासीयांना भीषण पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. कोट्यवधी रुपये खर्चुन पाणी योजना आणल्या. पण प्रत्यक्षात नळाला थेंबही येत नाही. रायगडातील 20 गावे आणि 103 वाड्यांना तर पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत असून त्यांना फक्त टँकरचाच आधार आहे. सुमारे 65 हजार ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तर अनेक ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी माता-भगिनींवर वणवण फिरण्याची वेळ आली आहे.

रायगड जिल्ह्यात मार्च महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता जास्त जाणवत असल्याने पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे येथील पाणवठे, विहिरींनी तळ गाठला आहे. तलावांमध्ये शेवटचा चिखल उरला आहे, धरणे आटू लागली आहेत, अनेक विहिरींवर पाणी योजना घेतल्याने त्या विहिरींची पाणीपातळी खूपच खालावली असल्याने बोअरवेलमधून पाणी येणे बंद झाले आहे. टँकरवाल्यांकडे विकण्यासाठीही पाणी शिल्लक राहिले नसल्याने अॅडव्हान्स पैसे देऊनही येथील नागरिकांना पाणी मिळत नाही.

एका टँकरसाठी तीन हजार रुपये
एकीकडे महागाईने कळस गाठला असतानाच ऐन पाणीटंचाईत ग्रामस्थांना टँकरमागे १ हजार रुपये जादा मोजावे लागत आहेत. वापरण्याच्या पाण्याचा १० हजार लिटरचा एक टँकर १ हजार २०० ते १ हजार ५०० रुपयांना मिळतो. तर पिण्याच्या पाण्याचा टँकर तीन हजार रुपयांना विकत घ्यावा लागत आहे. नाईलाजाने जास्त पैसे मोजून रायगडवासीयांना पाण्याचा टैंकर घ्यावा लागतो.

२० वाड्या-वस्त्यांमधील ६५ हजार ६३१ नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या सरकारी आकडेवारीपेक्षा जिल्ह्यातील पाणीटंचाईची दाहकता भीषण आहे.

जिल्ह्यातील एकाही नगरपालिका हद्दीत पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. शहरांपासून वाड्या-वस्त्यांपर्यंतचे ग्रामस्थ पाण्यासाठी व्याकूळ झाले आहेत. खासगी टँकरने पाणी घेण्यावाचून त्यांना गत्यंतर उरले नाही.

धरणांची पाणीपातळी खालावली आहे. अलिबागला पाणी पुरवणारे उमटे धरण असो की महाड शहरासह काही गावांची तहान भागवणारे कोथुर्डे धरण असो अनेक धरणांच्या पाण्याने तळ गाठला आहे.

पेयजल पाइपलाइनची दुरुस्ती सुरू
यावर्षी उन्हाचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झालेले आहे. त्याचबरोबर एमआयडीसीकडून होणाऱ्या पाइपलाइनची दुरुस्ती सुरू आहे. गाळाने साचलेल्या विहिरी, तलावांची स्वच्छता करण्यात येत आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे प्रमाण थोडे जास्त जाणवत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या वतीने टँकरने पाणी पुरवून नागरिकांची पाण्याची समस्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा विभाग)