तनीषा क्रास्टो व अश्विनी पोनप्पा या हिंदुस्थानी महिला जोडीने गुवाहाटी मास्टर्स सुपर 100 बॅडमिंटन स्पर्धेतील आपले विजेतेपद राखण्यात यश मिळविले. महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत हिंदुस्थानी जोडीने ली हुआ झोऊ व वांग जी मेंग या चीनी जोडीचा पराभव करून सलग दुसऱयांदा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या अव्वल मानांकित तनीषा-अश्विनी जोडीने विजेतेपदाच्या लढतीत ली-वांग जोडीचा 21-18, 21-12 असा 43 मिनिटांपर्यंत चाललेल्या लढतीत पराभव केला. हिंदुस्थानी जोडीने पहिल्या झटक्यात 8-2 अशी मुसंडी मारून आपले इरादे स्पष्ट केले, मात्र चिनी जोडीने गेमच्या मध्यापर्यंत 10-11 असे अंतर कमी करून हिंदुस्थानी जोडीवर दबाव आणला होता. 18-19 पर्यंत चिनी जोडी पिछाडीवर होती. मग हिंदुस्थानी जोडीने सलग दोन गुण मिळवित पहिला गेम जिंकला. दुसऱया गेममध्येही हिंदुस्थानी जोडीने 15-6 अशी मोठी आघाडी घेतली. ही लय कायम ठेवत तनीष-अश्विनी जोडीने विजयावर शिक्कामोर्तब केले.
अनमोल खरबला उपविजेतेपद
उदयोन्मुख बॅडमिंटनपटू अनमोल खरबला चीनच्या काई यानकडून फायनलमध्ये चुरशीच्या लढतीत 14-21, 21-13, 21-19 असा पराभव सहन करावा लागला.