सलग दुसऱ्या दिवशीही ‘दीनानाथ’वर चिल्लरफेक, विविध संघटनांचे आंदोलन

दीनानाथ रूग्णालयातील प्रशासनाच्या मुजोरपणामुळे आणि पैशांच्या मागणीवर अडून बसल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी रूग्णालयासमोर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले होते. त्यानंतर आजसुद्धा विविध संघटनांतर्फे रूग्णालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे रूग्णालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी रूग्णालयावर चिल्लर फेकली. तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यूस जबाबदार धरून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, शासनाने मोफत दिलेली जमीन परत घ्यावी, रुग्णांची लूट करून प्रचंड माया जमविलेल्या रुग्णालय प्रशासन, डॉक्टरांची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सकल मराठा समाजातर्फेही आज रूग्णालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मराठा समाजातर्फे करण्यात आली. याबरोबरच लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले. यातील काही आंदोलकांनी थेट रूग्णालयाच्या गच्चीवर चढत अर्धनग्न आंदोलन केले. याप्रकरणी डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी आणि मृत महिलेला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

इमर्जन्सीमधील रूग्णांकडून डिपॉझिट न घेण्याचा निर्णय

तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाला अखेर जाग आली आहे. इमर्जन्सीमधील रूग्ण, प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला किंवा बाल विभागात येणाऱ्या रूग्णांकडून कोणतेही डिपॉझिट घेणार नाही, असा निर्णय घेतला आहे. याबाबत वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी सर्वसामान्यांसाठी निवेदन जाहीर केले आहे.

तनिषा भिसे या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दीनानाथ रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, क्रिटिकल शस्त्रक्रिया असल्याने 10 लाख रुपये डिपॉझिट भरल्यानंतरच रूग्णाला दाखल करून घेण्याची भूमिका रूग्णालयाने घेतली होती. या गोंधळात उपचारास विलंब झाल्यामुळे तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. ही घटना समोर आल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी रूग्णालयाविरोधात जोरदार आंदोलने करत रूग्णालयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. राज्याच्या आरोग्य विभागानेही चौकशी समिती नेमली आहे. या प्रकरणाने रूग्णालयाची नाचक्की झाली आहे.

त्या पार्श्वभूमीवर रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी एका पत्राद्वारे विश्वस्तांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली आहे. तनिषा भिसे यांचा मृत्यू दुर्दैवी घटना आहे. मात्र, यापुढे दीनानाथ रुग्णालयात इमर्जन्सीमध्ये येणाऱया कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट घेतले जाणार नाही. सदर रुग्ण डिलिव्हरी विभागात आलेला असो किंवा मुलांच्या विभागात आलेला असो त्यांच्याकडून इमर्जन्सीमध्ये डिपॉझिट घेतले जाणार नाही, असा विश्वस्त आणि मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केला आहे. आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल, असे पत्रात नमूद आहे.