अपहरणाची बोंब; साडेचार तास ड्रामा, तानाजी सावंतांच्या मुलाचे बँकॉकला निघालेले विमान जमिनीवर

मिंधे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंतने खासगी विमान बुक करीत दोघा मित्रांसोबत दुपारी 4.30 च्या सुमारास पुणे विमानतळावरून बँकॉकला उड्डाण केले. आपल्या मुलाच्या प्रतापामुळे तानाजी सावंत हादरले. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल होताच पुणे पोलिसांनी शोधमोहिमेला गती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पुणे पोलीस यांच्या समन्वयाने बँकॉकच्या दिशेने निघालेले विमान देशाच्या हद्दीत थांबवण्यात आले. रात्री नऊच्या सुमारास पुणे विमानतळावर विमान दाखल झाले. ऋषीराज आणि त्याचे दोन मित्र पुण्यात परतले.

ऋषीराज तानाजी सावंत, प्रवीण प्रदीप उपाध्याय, संदीप श्रीपती वसेकर हे तिघेही मित्र असून, त्यांनी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. ऋषीराज माजी मंत्री तानाजी सावंत यांचा लहान मुलगा आहे. तीनही मित्रांनी काही दिवसांपुर्वीच दुबई ट्रीप केली होती. त्यानंतर त्यांनी बँकाँकला जाण्याचा प्लॅनिंग केले. मात्र, तिकडे जाण्यासाठी कुटूंबिय परवानगी देणार नाही, याची कल्पना ऋषीराजला होती. त्यामुळे त्याने परस्पररित्या कोणालाही माहिती न देता पुणे- बँकाँक खासगी विमान बुक केले. त्यासाठी ऋषीराजने लाखो रूपये आरटीजीएसद्वारे विमान कंपनीला दिल्याचे उघडकीस आले आहे. तिन्ही मित्रांनी 10 फेब्रुवारीला संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास खासगी विमानातून बँकाँकच्या दिशेने उड्डाण केले. दरम्यान, मुलाने परस्पररित्या खासगी विमान बुक करीत लाखो रुपये पैसे खर्च केले. त्यासोबत त्याच्या मित्रांनाही सोबत नेल्याचा राग कुटूंबियाला आला. त्यामुळे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या संस्थेतील एकाने मुलाचे नऱ्हेतून अपहरण झाल्याची तक्रार सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर तानाजी सावंत आणि त्यांचा मोठा मुलगा गिरीराज यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात धाव घेउन वरिष्ठ पोलीस अधिकारी, एअर ट्राफिक कंट्रोल यासह इतरांसोबत संवाद सुरू केला. पोलिसांनी तातडीने संबंधित विमान कंपनीसह एअर ट्राफिक कंट्रोलला संपर्क साधला. विमानाचा कॅप्टन आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे बोलणे झाले. विमान पुन्हा हिंदुस्थानातच थांबवण्याचे आदेश पोलिसांनी दिले. त्यानुसार रात्री 9 च्या सुमारास विमान पुणे विमानतळावर उतरविण्यात आले.

विमानासाठी मोजले 68 लाख

विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह क्रूची सर्व माहिती फ्लाईट मॅनिफेस्टद्वारे दिली जाते. त्याला पॅसेंजर मॅनिफेस्ट किंवा पॅसेंजर लिस्ट असे संबोधले जाते. ज्यामध्ये फ्लाइटमधील प्रवासी आणि क्रूबद्दल महत्त्वाची माहिती असते. संबंधित सर्व माहिती दैनिक ‘सामना’च्या हाती लागली आहे. क्रू डिटेल्समध्ये कॅप्टन रक्षित अग्निहोत्री, कॅप्टन श्रेस्थ अग्निहोत्री, फ्लाईट असिस्टंट जोयश्री नाथ आहेत. तर प्रवीण उपाध्याय, ऋषीराज सावंत, संदीप वसेकर हे तिघे प्रवाशी असल्याचे नमूद केले आहे. एअरक्राफ्टचे नाव फालकोन 2000 एलएक्स असे आहे. 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी विमानाने पुण्याहून बँकॉकच्या दिशेने उड्डाण केले होते यातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, खासगी विमान बुक करण्यासाठी ऋषीराज सावंतने तब्बल 68 लाख रुपये मोजल्याचे समजते.