तालिबानचे पाकिस्तानी चौक्यांवर हल्ले; रॉकेट डागले, अणुऊर्जा प्रकल्पातील 16 कामगारांचे अपहरण

दहशतवाद्यांना पोसणाऱया पाकिस्तानवर आता तालिबानी दहशतवाद्यांकडूनच हल्ले सुरू आहेत. खैबर पखतुनख्वात भागातील पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर अफगाण तालिबान आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) रॉकेट आणि उखळी तोफांनी हल्ले केले. तसेच अणुऊर्जा प्रकल्पातील 16 कामगारांचे अपहरण केले.

24 डिसेंबर 2024 रोजी पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानच्या पाकतिका आणि खोस्त भागात बॉम्ब हल्ले केले होते. यात 46 अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अफगाणिस्तान तालिबानने टीटीपीसोबत आपल्या 15 हजार लोकांना खैबर पखतुनख्वात सीमेवर पाठवले आहे. गुरुवारी पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांना टार्गेट करीत रॉकेट्स डागले. या चौक्या उद्ध्वस्त झाल्या असून, दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. सैन्याच्या चौक्यांवर हल्ले सुरू असतानाच तालिबानने खैबर येथील कबाल खेल परिसरातील अणुऊर्जा प्रकल्पातील 16 कामगारांचे अपहरण केले. हे कामगार एका वाहनातून घरी परतत होते. तालिबान्यांनी ते वाहन जाळले आणि 16 कामगारांचे अपहरण केले. अपहरणानंतर तालिबानने एक व्हिडिओ जारी केला आहे. पाकिस्तानच्या विविध तुरुंगामध्ये टीटीपीचे अनेक दहशतवादी आहेत त्यातील 10 प्रमुख कमांडर्सची सुटका करावी, अशी मागणी पंतप्रधान शाहबाज शरीफ सरकारकडे केली आहे.

बंदुकीचा धाक दाखवून तीन हिंदू तरुणांचे अपहरण

लाहोर – पाकिस्तानात हिंदूंवर अत्याचार सुरूच आहेत. पंजाब प्रातांतील लाहोर येथे बंदुकीचा धाक दाखवून तीन हिंदू तरुणांचे अपहरण केले. गुंडांच्या टोळीने हे अपहरण केले.