तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत वर्षभर शहराला मुबलक पाणीपुरवठा केला जातो. नगरपरिषद हद्दीत सुमारे 18 हजारांवर पाणीपट्टी करधारक आहेत. यंदा 20 जानेवारीअखेर पाणीपट्टी करवसुलीच्या एकूण उद्दिष्टाच्या केवळ 31.25 टक्के वसुली झाली आहे. त्यानुसार केवळ तीन कोटी 11 लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत, तर तब्बल सहा कोटी 64 लाख रुपये पाणीपट्टी करापोटीची थकबाकी आहे.
पवना आणि इंद्रायणी नद्यांमधून दोन जलउपसा केंद्रांतून तळेगाव दाभाडे शहराला मुबलक पाणीपुरवठा केला जातो. शासनाने जारी केलेल्या निर्देशांनुसार, नगरपरिषद हद्दीतील नळधारकांसाठी पाणीमीटर बसविणे अनिवार्य आहे. सहा वर्षांपूर्वी पाणी मीटर बसविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. सध्या नळ मीटरधारकांची संख्या आठ हजार 83 आहे. डमी मीटर पाच हजार 492, मीटर नसलेले वार्षिक बिलधारक पाच हजार 55, तसेच व्यावसायिक 45 आणि संस्थात्मक मीटरधारक 27 आहेत. गेल्या पाणीपुरवठा विभागासमोर वसुलीचे आव्हान तीन वर्षांपासून निवडणूक प्रलंबित असून, प्रशासकीय कारभार सुरू आहे. प्रशासकीय काळातील पाणीपट्टी करवसुली आणि पाणी मीटरचे उद्दिष्ट एकुणात नीचांकी असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
पाणीपट्टी थकबाकीवर कोणत्याही प्रकारचा दंड किंवा व्याज आकारण्याची तरतूद कायद्यात नसल्याने अनेक नागरिक नियमित किंवा थकबाकीचा भरणा करण्याबाबत उदासीन आहेत. पाणीमीटर आणि वार्षिक 1800 रुपये पाणीपट्टीतील फरकामुळे सोसायटीधारक पाणीपट्टी भरणा करीत नाहीत. गेल्या आठ वर्षांपासून पाणीपट्टी करआकारणीबाबतच्या निर्णयाचा मुद्दा प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्याचाही परिणाम वसुलीवर होत आहे. नगरपरिषदेतील नोंदीनुसार, गेल्या डिसेंबरअखेर हद्दीतील घरगुती नळधारकांची संख्या 17 हजार 636 आहे. व्यावसायिक 314, तर इतर 380 असे एकूण 18 हजार 330 नळजोडधारक आहेत. त्यांच्याकडून चालू वर्षात सुमारे नऊ कोटी रुपये पाणीपट्टी कराची मागणी आहे.
पाणीपट्टीकर भरण्यासाठी बिले अदा केल्यानंतरही, तसेच विविध माध्यमांतून आवाहन केल्यानंतरही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने 17 जानेवारीपासून मोठ्या थकबाकीदारांचे नळजोड तोडण्याच्या कारवाईस सुरुवात केली. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाने करधारक नागरिक, संस्था आणि वाणिज्यिक वापराच्या उद्योग-व्यवसायांना पाणी मीटर बसवून घेण्याचे आवाहन केले आहे. येत्या मार्चपूर्वी संबंधितांनी पाणी मीटर बसविले नाहीत, तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा विभागप्रमुखांनी दिला आहे. काही नळधारक पाणी मीटरचा गैरवापर करीत असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले असल्याने अशा नागरिकांवर कारवाई करण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
” पाणी हे जीवनावश्यक आहे. दररोजचा पाणीपुरवठा नियमित आणि मुबलक व्हावा, यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असून, प्राधान्याने काम करीत असते. पाणीपुरवठा यंत्रणेवर होणारा मोठा खर्च लक्षात घेता, आपआपली थकबाकी भरणे नागरिकांचे कर्तव्य आहे. थकबाकीवर दंडात्मक व्याजाची कारवाई जरी होत नसली, तरी नळजोड तोडण्याची कारवाई टाळण्यासाठी पाणीपट्टी करभरणा तातडीने करावा.
– विजयकुमार सरनाईक (मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे, नगरपरिषद)
■ थकीत मागणी : 4 कोटी 16 लाख 64 हजार रुपये
■ चालू मागणी : 5 कोटी रुपये
एकूण मागणी: 9 कोटी 66 लाख 66 हजार रुपये
■ मागील वसुली : 1 कोटी 97 लाख 84 हजार रुपये
■ चालू वसुली : 94 लाख 86 हजार रुपये
■ एकूण वसुली : 3 कोटी 2 लाख 177 रुपये
■ थकीत शिल्लक : 2 कोटी 18 लाख 82 हजार रुपये
■ चालू शिल्लक : 4 कोटी 55 लाख रुपये
■ एकूण शिल्लक : 6 कोटी 64 लाख 40 हजार रुपये