
तळा शहरातील रस्त्यांवर बसणाऱ्या मोकाट गुरांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याबाबत प्रसारमाध्यमांमधून बातम्या झळकल्यानंतर खडबडून जागे झालेल्या तळा नगरपंचायत प्रशासनाने मोकाट गुरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी एक चांगला फंडा अमलात आणला आहे. मोकाट गुरांच्या शिंगांना रेडियम चिकटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. आता रात्रीच्या वेळी रस्त्यात बसणारी जनावरे शिंगांना लावलेल्या रेडियमच्या चकाकीमुळे लगेच ओळखून येत आहेत.
रेडियममुळे जनावरांची शिंगे झगमगत असल्याने अपघात टाळण्यास मदत होत आहे. नगरपंचायतीच्या या फंड्याबाबत वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. तळा शहरातील रस्त्यांवर रात्रीच्या मोकाट गुरांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्यात बसलेली जनावरे दिसत नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालक अथवा प्रवासी रस्त्यावरून जात असताना अपघात वाढले होते.
या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी वाहनधारकांनी नगरपंचायतीकडे केली होती. यानंतर अपघात टाळण्यासाठी मोकाट गुरांच्या शिंगांना नगरपंचायतीच्या माध्यमातून रेडियमच्या पट्ट्या चिकटवण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा पट्ट्या गुरांच्या शिंगांना चिकटवल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालक सावध होतात.
दोघांचेही जीव वाचले
गुरांच्या शिंगांना चिकटवलेल्या रेडियमच्या पट्ट्या चमकताना दिसतात. वाहनांचा वेग कमी करून चालक बाजूने जातात. यामुळे वाहनचालक आणि जनावरे यांचा जीव वाचत आहे.