
वाढते शहरीकरण, फोफावलेली बांधकामे आणि त्यासाठी होणारी झाडांची बेसुमार कत्तल यामुळे यंदाचा उन्हाळा असह्य होणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाचा कहर झाला असून पालघर जिल्ह्यातील तलासरीची अक्षरशः भट्टी झाली आहे. तलासरीचे तापमान 43.6 अंशांवर पोहोचले आहे. मुरबाडचा पारा 43.2, कल्याणचा पारा 42.4, डोंबिवलीचा पारा 42.3 वर पोहोचल्याने ही शहरेही तापली आहेत. मार्च महिन्यातच तापमानाने उच्चांक गाठल्याने पुढचे तीन महिने कसे काढायचे याचे टेन्शन ठाणे-पालघरवासीयांना आले आहे.
■ हवामान तज्ज्ञांच्या मते शहरातील झाडांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने सूर्यकिरणे थेट जमिनीवर पडत आहेत आणि त्यामुळे उष्णता वाढत आहे.
■ कल्याण-डोंबिवलीतील वाढती वाहनसंख्या आणि एमआयडीसी परिसरातील कारखान्यांमधून निघणारे प्रदूषण यामुळेही उन्हाचा त्रास अधिक जाणवत आहे.
■ हवामान खात्याने येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे आणि शरीर थंड ठेवण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, पालघर आणि ठाणे परिसरात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध उपाययोजना करत आहेत. महिलांनी स्कार्फने डोके झाकायला सुरुवात केली आहे. पुरुष मंडळी टोपी, मफलर आणि हेल्मेट घालून प्रवास करत आहेत. अनेकांची पावले कोल्ड्रिंकची दुकाने, सरबताच्या गाड्या आणि रसवंतीकडे वळत आहे.
मंगळवारचे कमाल तापमान
ठाणे 40.7
विरार 41
कर्जत 41.4
पनवेल 41.5
पालघर 42
उल्हासनगर 42
बदलापूर 42
मुंब्रा 42.2
डोंबिवली 42.3
कल्याण 42.4
मुरबाड 42.3
तलासरी 43.6