अमली पदार्थ तस्करी, विक्री, सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा! शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दिंडोशी विधानसभा परिसरातील कुरार गाव, मालाड (पूर्व) आणि दिंडोशी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट सुरू असून, अमली पदार्थ सेवनामुळे या परिसरातील तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर अमली पदार्थांची तस्करी, विक्री आणि सेवन करणाऱयांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी दिंडोशी विधानसभेचे आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रातून केली आहे.

आमदार सुनील प्रभू यांनी गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून चर्चा उपस्थित केली होती. त्यावर सरकारच्या वतीने कारवाई केली जाईल, असे आश्वासन तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते; परंतु अद्याप दिंडोशी विधानसभा क्षेत्रात अंमली पदार्थ तस्करी, विक्री व सेवनाचे गैरप्रकार करणाऱयांचे रॅकेट नष्ट करण्यात आलेले नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत पोलीस सहआयुक्त, उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे वारंवार मागणी करूनदेखील कारवाई होत नाही ही बाब अतिशय गंभीर असल्याचे आमदार प्रभू यांनी पत्रात म्हटले आहे.

…तर फडणवीस यांच्याविरोधात हक्कभंग आणणार

गेल्या अधिवेशनात तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्याप कारवाई झालेली नाही, फडणवीस यांनी मला खोटे आश्वासन दिले. याबाबत येत्या नागपूर अधिवेशनात फडणवीस यांच्याविरोधात हक्कभंग आणावा लागेल, असा इशारा सुनील प्रभू यांनी दिला.

अमली पदार्थांचे खुलेआम सेवन

व्यसनाधीन तरुण मुलांचे भवितव्य अंधःकारमय झाले आहे. मोकळय़ा जागेत तसेच वाईन शॉप अथवा बीअर शॉपीचा परवाना असलेल्या दुकानांसमोर तेथेच मद्य विकत घेऊन त्या दुकानासमोरच दारू प्यायली जाते तसेच अमली पदार्थांचे सेवन केले जाते. याबाबतदेखील वारंवार तक्रार करून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे लोकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.

इथे सुरू आहे ड्रग्जचा धंदा

दिंडोशी व कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात विशेषतः बुवा साळवी मैदान, पारेखनगर गार्डन, दिंडोशी न्यायालयामागील गार्डन, ओमकार एसआरए बिल्डिंग, तपोवन बिल्डिंगजवळचे गार्डन, पिंपरीपाडा माजी मार्केट, संतोषनगर मार्केट, शिवशाही वसाहत, म्हाडा वसाहत गणपती मंदिराजवळ, आंबेडकरनगर भाजी मार्केट यासह अनेक ठिकाणी विक्री होत आहे.