हा निकाल ठेवून पुन्हा मतपत्रिकेवर निवडणुका घ्या आणि मग पाहा निकाल, संजय राऊत यांचे आव्हान

ईव्हीएम संदर्भात आमच्याकडे 450 तक्रारी आल्या, पण निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली नाही अशी माहिती (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच हा निकाल तसाच ठेवून मतपत्रिकेवर निवडणूक घ्या आणि मग पहा निकाल काय लागतो असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.

आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शब्द पाळण्याची भारतीय जनता पक्षाची परंपरा नाही. आता त्यांना महाराष्ट्राशीच वैर घ्यायचे असल्यामुळे ते अशी कोणतीही भुमिका घेऊ शकतात. एका व्यक्तीवर पराभवाचे खापर फोडता येणार नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलोय. शरद पवार यांच्यासारखा नेता ज्यांच्यामागे महाराष्ट्र उभा आहे असं चित्र होतं त्यांनाही अपयश आलं. या अपयशाची कारणं शोधली पाहिजे ती कारणं ईव्हीएममध्ये आहेत, यंत्रणेच्या गैरवापरात आहेत, घटनाबाह्य कृत्यांमध्ये आहेत की माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न घेतलेल्या निर्णयामध्ये आहेत. यातलं मुख्य कारण शोधावं लागेल. यासाठी कोण जबाबदार आहे यातून बाहेर पडलं पाहिजे. आम्हि तिघांनी मिळून एकत्र निवडणूका लढलो होतो, एखाद दुसऱ्या जागेवर आमच्यामध्ये वेगळ्या भुमिका असतील. हे अपयश महाविकास आघाडीचे आहे एका व्यक्तिगत अपयश नाही. ज्या पद्धतीने आमचे विरोधक निवडणुकीसाठी उतरले होते, त्याला मी फेअर निवडणूक मानत नाही. आजही आमचे ठिकठिकाणचे कार्यकर्ते ईव्हीएम संदर्भात बातम्या देत आहेत. नंबर मॅच होत नाहियेत किंवा ईव्हीएम इकडे तिकडे हलवण्यात आले, मतांचा आकडा मॅच होत नाही अशा अनेक गोष्टी आहेत. नाशिकमधल्या एका उमेदवाराच्या घरात 65 लोक होते आणि त्यांना चार मतं पडली. डोंबिवलीत ईव्हीएमचे नंबर मॅच होत नाहियेत. त्यावर आक्षेप घेतला पण निवडणूक आयोगाचे लोक मानत नाहीत. हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडल्याचे स्पष्ट होत आहे. ठाण्यात मतदान झाल्यानंतर दोन टेम्पो भरून ईव्हीएम संभाजीनगरला नेले आणि त्यात फीडींग करून परत ठाण्यात आणल्या गेल्या. तिथून ईव्हीएम डिस्ट्रिब्युट करण्यात आल्या. या सगळ्या गोष्टी पुराव्यासह समोर आल्या आहेत. चांदिवलीत दिलीप लांडेंनी असं काय कर्तुत्व केलं की त्यांना जवळपास एक लाख 40 हजार मतं पडावीत. असं काय महान क्रांतिकारक काम केलं की त्यांना दीड दीड लाख मतं पडावीत. काल पक्षातून गेलेले लोक आमदार झालेत. मला आश्चर्य वाटतंय की शरद पवारांनी असा संशय व्यक्त केला नव्हता. काल त्यांनाही वाटलं काही तरी गडबड आहे असे संजय राऊत म्हणाले.

माझ्याकडे ईव्हीएम संदर्भात 450 तक्रारी जमा झाल्या आहेत. आम्ही त्या त्या वेळेला आक्षेप घेऊन सुद्धा त्याची दखल घेतली नाही. या निवडणुका सरळ मार्गाने झाल्या, असं तम्ही कसं म्हणू शकता. म्हणून माझी मागणी आहे हा निकाल तसाच ठेवा आणि पुन्हा ही निवडणूक मतपत्रिकेवर घ्या आणि मग पहा निकाल काय लागतो. पोस्टल मतदान जे मतपत्रिकेवर होतं त्यात आम्ही आघाडीवर आहोत. मतपत्रिकेवर सकाळी जी मतमोजणी सुरू झाली तो कल महाविकास आघाडीच्या बाजूने होता. आणि तासाभरात आम्हाला जागाच मिळत नाहीत हे शक्य आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

आम्ही हरलो म्हणून आम्ही रडीचा डाव खेळत नाहा आहोत. मतपत्रिकेवर निवडणूका घ्या हे आम्ही दहा वर्ष झाली सांगतोय. ते म्हणतील झारखंडमध्ये जिंकले, मग झारखंड तुम्ही जिंका आम्ही महाराष्ट्र जिंकतो असं करा एक दिवस. आता उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका असतील तर त्यासोबत आणखी एका छोट्या राज्याची निवडणूक असेल. तेव्हा ईव्हीएममधून छोटं राज्य विरोधी पक्षांना जिंकून देतील आणि उत्तर प्रदेश बिहार ते जिंकतील असे संजय राऊत म्हणाले.