![rahul supriya1](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/rahul-supriya1-696x447.jpg)
लोकशाही सशक्त ठेवण्यासाठी निःपक्ष आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका घेण्यात याव्या, ही आमची मागणी आहे. मतदार, चिन्ह आणि पक्ष फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. आमच्यावर सतत वार होत आहे. आम्ही मतदार यादी मागत आहोत त्या द्या. महाराष्ट्रामध्ये अचानक मतदारांची संख्या अचानक वाढली कशी ? याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे, असेही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वाढलेल्या मतदानाबाबत सवाल उपस्थित केले. या पत्रकार परिषदेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत उपस्थित होते. या तीन नेत्यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तम जानकर आमदार म्हणून निवडून आले. मात्र उत्तम जानकर यांचं असं म्हणणं आहे की, आपण निवडून आलो असलो तरी ज्याप्रमाणात मतदान व्हायला हवं होतं, तसे झाले नाही. त्यामुळे उत्तम जानकर बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची मागणी करत आहेत. अशाच घटना राज्यात अनेक विधानसभा मतदारसंघात घडल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा, अशी आमची मागणी आहे. आमचा पक्ष फोडला. आमदार फोडले. आम्ही अजूनही लढत आहोत. आम्हाला तुतारी चिन्ह दिलं. साताऱ्यातील एका जागेवर ट्रम्पेट आणि तुतारीमुळे पराभव झाला. सेम चिन्हामुळे लोकांचा संभ्रम होत असल्याचं आम्ही सांगितलं होते. तरीही चिन्ह बदलण्यात आलं नाही. याच कारणामुळे आमच्या 11 जागा गेल्या, असेही त्या म्हणाल्या.
मतदार, चिन्ह आणि पक्ष आणि आमदार,खासदार फोडण्याचा हा विषय आहे. आमच्यावर सतत वार होत आहे. लोकशाही सशक्त ठेवण्यासाठी फेअर निवडणुका व्हाव्यात. आम्ही मतदार यादी मागत आहोत. त्या द्या. बाकी काय मागत आहोत.ऑनलाईन नाव वाढवू शकतात. मी रोज मॉनिटर करायचे. शेवटच्या तीन दिवसात आम्ही निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना त्यावेळी ही नाव वाढली. लाडकी बहीण योजनेतही बोगस आधारकार्ड मिळाले आहेत, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
समान चिन्ह देणं, पक्ष फोडणे आणि मतदारांची नावं वाढवणं असा एकत्रितपणाने केलेला हल्ला आहे. तसेच ईव्हीएम मशीनचाही गैरवापर केला जात आहे. देशामध्ये सशक्त लोकशाही ठेवायची असेल तर निवडणुका निःष्पक्षपणे घेणे गरजेचे आहे. पराभवाचे दुःख नाही. याचा निर्णय जनता घेते. मात्र, निवडणूक आयोगाने योग्य आणि पारदर्शकपणे काम करण्याची गरज आहे. जी मतदारांची यादी आम्ही मागत आहोत ती यादी फक्त द्या, लोकशाहीसाठी आम्ही फक्त ही मागणी करत आहोत, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.