पाटण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी दि. २३ नोव्हेंबरला झाली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाटण शहरातून बेकायदेशीर विजयी मिरवणूक काढली. मतदान केंद्रात गेले. त्यावेळी पोलीस व संबंधित यंत्रणांनी बघ्याची भूमिका घेतली. मात्र, आमच्या कार्यकत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार पोलीस यंत्रणा करत आहे. कायदा मोडला त्यांच्यावर तातडीने गुन्हे नोंदवावे; अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा देत संबंधित वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी पाटण येथे पत्रकार परिषदेत केली. सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, २३ नोव्हेंबरला पाटण येथील समाजकल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाली.
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पाटण शहरातील मुख्य बाजारपेठेतून पूर्णपणे वाहतुकीला व विजयी मिरवणूक काढण्यास बंदी घालण्याचे आदेश अधिकृतरीत्या जाहीर केले होते. तरीही संबंधित विजयी उमेदवाराने पाटणमधून विजयाची मिरवणूक काढली. मतमोजणी केंद्रात शासकीय यंत्रणा, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी वगळता अन्य कोणालाही प्रवेश नव्हता तरीही त्या ठिकाणी विजयी उमेदवारांचे कुटुंबीय वाहनाने मतदान केंद्रांत घुसले होते. अशावेळी शासकीय यंत्रणांचे कॅमेरे, ड्रोन यात शूटिंग झालं असतानाही याविरोधात कोणतीही कारवाई न करता पोलीस व संबंधित यंत्रणांनी केवळ हाताची घडी व तोंडावर बोट अशीच भूमिका घेतली. पाटण शहरातून बेकायदेशीर मिरवणूकही काढली.
एका बाजूला ज्यांनी राजरोसपणे कायद्याची पायमल्ली केली त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल न करणारे पोलीस दुसरीकडे मात्र राजकीय दबावापोटी व्हिडीओ शूटिंगचा आधार घेत आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून संबंधितांना पाटण, कराड, सातारा येथील पोलीस ठाण्यात हेलपाटे मारायला लावत आहे. कार्यकर्त्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही धमकावण्याचे प्रकारही पोलीस यंत्रणांमार्फत सुरू आहेत. याबाबत संबंधित उमेदवार किंवा त्यांच्या निकटवर्तीयांची कोणती तक्रार आहे की नाही याची माहिती पोलीस यंत्रणा देत नाहीतच याउलट स्वतः पोलीसच फिर्यादी झाल्याचे सांगतात. पोलीस व संबंधित यंत्रणांच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोतच. याशिवाय अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात खटलेही दाखल करणार असल्याचे पाटणकर यांनी सांगितले.
अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील
राजकीय दबावापोटी अशा प्रकारच्या बोगस कारवाया करायला लावण्यापेक्षा हिम्मत असेल तर पोलिसांमागे न दडता समोर येऊन स्वतःच्या नावावर व पुराव्यांनिशी तक्रारी दाखल करा. त्याला जशास तसे उत्तर देण्याची धमक आमच्यात व आमच्या कार्यकर्त्यांच्यात आहे. यापुढेही आमची लढाई ही जशास तशीच राहील याचे भान संबंधितांसह पोलीस व अन्य प्रशासनाने राखावे; अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही पाटणकर यांनी दिला.