रिफायनरी विरोधकांना धमकी देणाऱ्या खासदार नारायण राणेंवर कारवाई करा; विनायक राऊत आक्रमक

बारसू – सोलगाव रिफायनरी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांना खासदार नारायण राणे यांनी रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या विरोधकांना परत जाऊ देणार नसल्याची धमकी दिली. या धमकीवर रिफायनरी विरोधकांना धमकी देणाऱ्या खासदार राणेंवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

मंगळवारी नारायण राणे यांनी राजापूर येथील विरोधकांना परत जाऊ देणार नाही अशी धमकी दिली. खासदार राणे यांचा गुन्हेगारी वृत्तीचा पूर्व इतिहास पाहिल्यास रिफायनरीला विरोध करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे. राणे यांच्या धमकीची गांभिर्याने दखल घ्यावी तसेच त्यांच्यावर पोलीस कारवाई करावी आणि विरोधकांच्या जीविताचे रक्षण करावे अशी मागणी करणारे निवेदन माजी खासदार विनायक राऊत यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे दिले आहे.

माजी खासदार विनायक राऊत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध आहे. “शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे, आमदार राजन साळवी आणि मी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्यासह रिफायनरीला विरोध करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना पाठिंबा देऊन सातत्याने रिफायनरीविरोधातील आंदोलनात सहभागी होत असतो. खासदार नारायण राणे यांनी मंगळवारी राजापूर येथे रिफायनरी विरोधकांना परत जाऊ देणार नाही असे वक्तव्य केले आहे”. त्या वक्तव्याच्या बातमीची कात्रणेही सोबत जोडत असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी निवेदनात म्हटले आहे.