लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत आहे. स्थानिकांच्या आणि भाविकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतोय. त्यामुळे राज्य सरकारने याची तत्काळ दखल घेऊन प्रक्रिया न करता नदीत रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून प्रक्रिया न केलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे इंद्रायणी नदी दूषित झाली आहे. दैनिक ‘सामना’मध्ये सोमवारी याबाबत ‘इंद्रायणीत पुन्हा विषारी फेसाचा पूर’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीचा दाखला देत आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वरून सरकारवर जोरदार टीका केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या वर्षीसुद्धा हा मुद्दा आम्ही प्रशासनाच्या दृष्टीस आणून दिला होता. पण त्यानंतरही कार्यवाही शून्यच! यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कटाक्षाने लक्ष देऊन लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणीच्या स्वच्छतेचा प्रस्ताव केंद्राकडूनही शक्य तितक्या लवकर मंजूर करून घ्यावा तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया न करता नदीत सोडणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.