तहव्वूर राणाच्या याचिकेला NIAचा विरोध; कुटुंबाशी बोलण्यासाठी न्यायालयाकडून मागितली परवानगी; 24 एप्रिलला निर्णय

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा याने 22 एप्रिल रोजी एनआयएच्या विशेष न्यायालयात त्याच्या कुटुंबाशी बोलण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी एनआयएने याचिकेला विरोध केला. एनआयएने न्यायालयाला सांगितले की, जर राणाला त्याच्या कुटुंबाशी बोलण्याची परवानगी दिली तर तो काही महत्त्वाची माहिती देऊ शकतो. याचा तपासावर परिणाम होऊ शकतो. न्यायालयाने आता या प्रकरणातील निर्णय 24 एप्रिलपर्यंत राखून ठेवला आहे.

दरम्यान, तहव्वूर राणाला 10 एप्रिल रोजी अमेरिकेतून दिल्लीत सुपर मिड-साईज बिझनेस जेट विमानाने आणण्यात आले. यानंतर एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने राणाला तत्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास राणाला घेऊन एनआयएच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांचा ताफा दाखल झाला. त्यानंतर त्याला पटियाळा कोर्टामध्ये हजर करण्यात आले. एनआयएने कोर्टाकडे 20 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र कोर्टाने 18 दिवसांची कोठडी सुनावली होती.