दिल्लीतही 26/11 घडवण्याचा होता डाव, विशेष न्यायाधीशांच्या आदेशातून माहिती उघडकीस

मुंबईत विविध ठिकाणी केलेल्या दहशतवादी हल्ल्यासारखाच हल्ला दिल्लीतील विविध महत्त्वाच्या ठिकाणी घडवण्याचा तहव्वूर राणा आणि डेव्हिड कोलमन हेडली यांचा डाव होता, अशी धक्कादायक माहिती विशेष न्यायाधीशांनी 10 एप्रिल रोजी दिलेल्या 12 पानी आदेशातून समोर आली आहे. त्यामुळे दिल्लीत संसद भवनापासून मंत्री, नेत्यांची निवासस्थाने तसेच लाल किल्ल्यासह अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती का? असा प्रश्न उपस्थित झाला असून एनआयए समोर तहव्वूर राणाकडून याबाबतची माहिती काढून घेण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

तपास यंत्रणांनी सादर केलेले पुरावे राणावर करण्यात आलेल्या आरोपांची पुष्टी करण्यासाठी तसेच देशाच्या सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेसे आहेत. त्यामुळे राणाची एनआयए कोठडी अत्यंत गरजेची आहे, असे विशेष एनआयए न्यायाधीश चंदर जीत सिंह यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. तपास यंत्रणांनी न्यायालयात सादर केलेले पुरावे देशाच्या सीमारेषा आणि विविध महत्त्वाची शहरे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती ही बाब प्रकर्षाने अधोरेखित होते. हे लक्षात घेता राणाकडून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध प्रकारची संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण माहिती काढून घेता येईल, असेही विशेष न्यायाधीशांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

एनआयए रोज करणार  10 तास चौकशी

एनआयए राणाची रोज 8 ते 10 तास चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राणाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला दिल्ली कोर्टाने वकिलांना भेटण्याची परवानगी दिली आहे. चौकशीदरम्यान राणा सहकार्य करत आहे. मुख्य तपास अधिकारी जया रॉय यांच्या नेतृत्वाखाली एनआयएचे पथक राणाची चौकशी करत आहे.

राणाने मागितले पेन, पेपर आणि कुराण

राणाने आपल्याला पेन, पेपर शीट किंवा नोटपॅड आणि कुराण देण्यात यावे अशी मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राणाने आपल्याला खास अन्नपदार्थ देण्यात यावे अशी मागणी केलेली नाही. जे अन्नपदार्थ आरोपींना देण्यात येत आहेत, तेच त्यालाही देण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्यासाठी कोठडी हवी

दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आला. या कटाच्या मुळाशी खोल जाण्यासाठी राणाची एनआयए कोठडी गरजेची आहे. तपासादरम्यान फॉरेन्सिक आणि दस्तऐवज स्वरूपातील ताब्यात घेण्यात आलेले पुरावे यांच्यासह राणा व साक्षीदारांचा आमना-सामना करायला हवा. तसेच राणाने विविध ठिकाणांची केलेल्या रेकीशी संबंधित मटेरियल पाहता आणि संपूर्ण कट उघड करण्यासाठी राणाची एनआयए चौकशी करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता,  राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी देण्याची गरज असल्याचे विशेष एनआयए न्यायाधीशांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. राणाच्या चौकशीमुळे एनआयएला अनेक गोष्टी उघड करण्याची संधी मिळेल आणि आणखी पुराव्यांसह त्याला पुन्हा कोर्टात सादर करता येईल असेही न्यायाधीशांनी म्हटले आहे.