प्रत्यार्पण टाळण्यासाठी तहव्वूर राणा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात, शेवटचे अपीलही फेटाळल्यास पुन्हा याचिका करता येणार नाही

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याने हिंदुस्थानकडे प्रत्यार्पणाविरोधात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यंदाच्या 15 ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने हिंदुस्थान-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार तहव्वूरला हिंदुस्थानात पाठवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात राणा सर्वोच्च न्यायालयात गेला आहे.

सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्याला हिंदुस्थानच्या ताब्यात देऊ नये अशी याचिका राणा या पाकिस्तानी वंशाच्या कॅनेडियन व्यावसायिकाने गेल्या वर्षी फेडरल कोर्ट नाइन्थ सर्किटमध्ये दाखल केली होती. ही याचिका फेटाळण्यात आली. मे 2023मध्येही अमेरिकन कोर्टाने याचिका फेटाळली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने तहव्वूरचे अपील फेटाळले तर त्याला पुढे अपील करता येणार नाही. त्यानंतर तहव्वूरला हिंदुस्थानात आणण्यात येईल. तहव्वूरवर मुंबई हल्ल्याला आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे.