ताडदेवमधील कोळी महिलांना गाळे रिकामे करण्यासाठी दमदाटी करून काही गाळे आणि शौचालयावर चक्क बुलडोझर चालवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. परवाना असतानाही कोणतीही नोटीस आणि पुनर्वसनाचे आश्वासन न देता कारवाई करणाऱया मुंबई महापालिकेच्या डी विभागातील परवाना अधिकारी राजेश परमार याची खातेनिहाय चौकशी करून त्याला बडतर्फ करावे, अशी मागणी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी महापालिका आयुक्त आणि नगरविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.
ताडदेव येथील बेलासिस ब्रिजजवळ कोळी महिला 1970 पासून मासे विकण्याचे पारंपरिक काम करतात. तिथे 36 मासळी विक्री गाळे (ओटा) सुरू आहेत. या मासळी गाळय़ांवरच भूमिपुत्र असलेल्या कोळी महिलांचा उदरनिर्वाह चालतो. या सर्व कोळी महिलांची महापालिकेअंतर्गत परवानाधारक म्हणून नोंद आहे.
महिलांवर उपासमारीची वेळ
कोळी महिलांना तिथून हुसकावून लावण्याचा कट रचण्यात येत आहे. या महिला हे प्रामुख्याने रविवार, बुधवार आणि शुक्रवारी पूर्ण दिवस कार्यरत असतात. इतर दिवशी मासे विक्रीसाठी महिला कमी संख्येने असतात. याचा फायदा घेत सोमवारी येथील सुख्या मासळीच्या गाळय़ांवर आणि शौचालयावर बुलडोझर चालवला. यामुळे या गरीब, विधवा, वृद्ध महिलांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
गुजराती रहिवाशांचा मासे विक्रीला विरोध
महापालिकेने ही सगळी कारवाई शेजारी नव्याने उभ्या राहिलेल्या गुजराती रहिवाशांच्या इमारतीनंतर सुरू झाली आहे. या गुजराती रहिवाशांचा इथे मासे विक्रीला विरोध आहे. या रहिवाशांच्या सूचनेनंतर महापालिकेकडून ही कारवाई सुरू झाली आहे, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला.