जगविख्यात तबला वादक झाकीर हुसैन यांचे नुकतेच निधन झाल्याची बातमी समोर आली आहे आणि संपूर्ण संगीतसृष्टीवर शोककळा पसरली. त्यानिमित्ताने झाकीर हुसेन यांच्या काही आठवणींना उजाळा देऊया.
झाकीर हुसैन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला होता. त्यांचे वडिल उस्ताद अल्ला राखाही प्रसिद्ध तबला वादक होते. झाकीर हुसैन हे घरातील मोठे अपत्य होते. त्यांचे दोन्ही भाऊ तौफीक कुरेशी आणि फजल कुरैशीही तबला वादक आहेत. तर त्यांच्या एका भावाचे लहान वयात निधन झाले. सेंट मायकल हाय स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले त्यानंतर मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. पण शिक्षण पूर्ण करण्याआधीच ते तबलावादक झाले, कारण त्यांना लहानपणापासूनच तबला वादनाची आवड होती. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी वडिलांकडून ते मृदंग वाजवायला शिकले. काही वर्षातच ते संगीताचे कार्यक्रम करु लागले.
झाकीर हुसैन यांना लहानपणापासून तबला वादनाची आवड होती. ते वयाच्या 12 व्या वर्षापासून ते वडिलांसह कार्यक्रमांमध्ये तबला वादन करत होते. वयाच्या बाराव्या वर्षी अमेरिकेत आपला पहिला परफॉर्मन्स दिला होता.त्यावेळी त्यांनी 5 रुपये मानधन मिळाले होते. ते पाच रुपये त्यांच्यासाठी अमुल्य ठेवा असल्याचे त्यांनी अनेकदा मुलाखतींमधून व्यक्त केले होते. झाकीर हुसैन यांनी वॉशिंग्टन विद्यापिठातून संगीतात डॉक्टरेटची पदवी मिळवली होती. त्यांच्या या टॅलेंटमुळे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाही इंप्रेस झाले होते. त्यासाठी ओबामा यांनी ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी झाकीर यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले होते. ती त्यांच्यासाठी मोठी झेप होती.
झाकीर हुसैन यांचा अनेक पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. 1988 मध्ये झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) यांना पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण, 2023 मध्ये पद्मविभूषण या पुरस्करांनी गौरवण्यात आले आहे. तसेच 1990 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा संगीत पुरस्कारही मिळाला होता. 2009 मध्ये झाकीर हुसैन 51 व्या ग्रॅमी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब ही आहे की, झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) यांना त्यांच्या कारकिर्दीत 7 वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते त्यापैकी चारवेळा त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं