बार्बाडोस विमानतळ केलं बंद; टीम इंडिया हॉटेलमध्येच अडकली

 

टी-20 वर्ल्ड कप 2024 वर टीम इंडियानं नाव कोरलं आणि जगभरात हिंदुस्थानींनी आनंदोत्सव साजरा केला. हिंदुस्थानला टीम इंडियाच्या आगमनाची ओढ लागली आहे. मात्र तिकडे टीम इंडिया बार्बाडोसमध्येच अडकली आहे. परिस्थिती देखील तशीच आहे. कारण बार्बाडोसमधील विमानतळ बंद करण्यात आलं आहे.

रविवारी, 30 जून रोजी चक्रीवादळ बेरिल तीव्र झाल्याने बार्बाडोस विमानतळ बंद करण्यात आल्यानं हिंदुस्थानी क्रिकेट संघाला त्यांच्या हॉटेलमध्ये तळ ठोकणं भाग पडलं आहे. 29 जून रोजी टी-20 वर्ल्ड कप 2024 जिंकणारा हिंदुस्थानी संघ बेटावरच अडकून पडेल असं रविवारी सांगण्यात आलं होतं. कारण बेरिल सोमवारी सकाळी धडकणार अशी अपेक्षा होती. बेरिल जेव्हा बार्बाडोसमध्ये उतरेल तेव्हा ते अधिक गंभीर परिणाम करेल अशी शक्यता होती.

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार बेरिल आता तीव्र झालं आहे असून अशावेळी प्रवास थांबवण्याचे आदेश देण्यात येतात. बार्बाडोस विमानतळ बंद करण्यात आलं आहे आणि कोणालाही बाहेर पडण्याची परवानगी नसल्याने कर्फ्यूसारखी परिस्थिती आहे. बेरिल पुढील काही तासांत बार्बाडोसला धडकेल अशी अपेक्षा आहे आणि हिंदुस्थानी संघ हॉटेलमध्येच थांबेल.

‘म्हणून बार्बाडोस विमानतळ बंद करण्यात आलं आहे. आता कर्फ्यूसारखी परिस्थिती आहे आणि कोणालाही बाहेर पडण्याची परवानगी नाही. बेरिल चक्रीवादळ येत्या 6 तासांत धडकण्याची शक्यता आहे. आधीच रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. बेरिल नं लेव्हल 4 (दुसरी सर्वात गंभीर लेव्हल) गाठली आहे. टीम इंडियाला हॉटेलमध्ये थांबवण्यात आलं असून त्यांच्या सुरक्षेची आणि खानपानाची व्यवस्था ठेवण्यात आली आहे, पुढील प्रवास कधी सुरू होणार याबद्दल कुणाला माहिती नाही.

वॉशिंग्टन पोस्टनुसार, बेरिल विंडवर्ड बेटांवर 130 मैल प्रतितास पेक्षा जास्त वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह धडकेल असा अंदाज आहे. चक्रीवादळाची माहिती देणाऱ्या केंद्रानं 6 ते 9 फूट आणि पावसाचे प्रमाण 3 ते 6 इंच दरम्यान वादळाचा अंदाज वर्तवला आहे.

चक्रीवादळ केंद्राच्या म्हणण्यानुसार, सोमवार उशिरा ते बुधवारपर्यंत आग्नेय आणि मध्य कॅरिबियन समुद्र ओलांडून प्रवास करताना वादळ आपली ताकद कायम ठेवेल असा अंदाज आहे.