T20 WC Final : बार्बाडोसच्या मैदानावर रोहित शर्मानं तिरंगा रोवला; खेळपट्टीवरील ‘पवित्र’ माती चाखत नतमस्तक झाला

वेस्ट इंडिजमधील बार्बाडोसच्या मैदानावत झालेल्या अंतिम लढतीत टीम इंडियाने बाजी मारली आणि दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी मात देत वर्ल्डकप जिंकला. टीम इंडियाने विजयासाठी दिलेले 177 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या या तिकडीने 8 बाद 169 धावांवर रोखले. संपूर्ण स्पर्धेत धावांसाठी संघर्ष केलेल्या विराट कोहलीने मोक्याच्या क्षणी अर्धशतकीय खेळी केल्याने त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ आणि 8 लढतीत 15 विकेट्स घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

अक्षर पटेलच्या एकाच षटकामध्ये 24 धावा पडल्याने सामना हातातून निसटला असे वाटत असतानाच हार्दिक पंड्याने क्लासनची विकेट काढली आणि त्यानंतर बुमराह व अर्शदीपने टिच्चून गोलंदाजी केली. सूर्यकुमार यादवने मिलरचा कॅच घेत सामना टीम इंडियाच्या बाजूने फिरवला. धडधड वाढवणाऱ्या लढतीत टीम इंडियाने विजय मिळवताच कॅप्टन रोहित शर्मा अक्षरश: मैदानावर झोपला आणि त्याने अश्रुंना वाट मोकळी करून दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

तब्बल 17 वर्षानंतर टी-20 वर्ल्डकप आणि 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकल्याने रोहित शर्मासह हार्दिक पंड्या आणि इतर खेळाडूंनाही अश्रू अनावर झाले. रोहितने विराट आणि पंड्याची गळाभेट घेतली. त्यानंतर ज्या खेळपट्टीवर हा सामना झाला त्या बार्बाडोसच्या खेळपट्टीवर बसून रोहित शर्माने तिथल्या पवित्र मातीचे कण तोंडात घातले आणि नतमस्तक झाला. तत्पूर्वी त्याने बार्बाडोसच्या मैदानावर तिरंगा रोवला. प्रत्येक देशवासियाला भावूक करणाऱ्या या क्षणांचा व्हिडीओ आयसीसीने शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

विराट-रोहितचा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटला रामराम

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत वर्ल्डकप जिंकला. या वर्ल्डकपसह दोन दिग्गज खेळाडूंनी आपल्या टी-20 कारकिर्दीला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला. सामनावीर विराट कोहली आणि कॅप्टन रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटला रामराम केला.

देशभरात जल्लोष

दरम्यान, टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकताच देशभरात जल्लोष सुरू झाला. रात्रीचे 12 वाजून गेले असले तरी कट्टर क्रीडाप्रेमी आणि देशप्रेमी रस्त्यावर उतरले. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर सुरू झाला. आबालवृद्धांनी या विजयाचा आनंद घेत मनसोक्त डान्स केला, एकमेकांना मिठाई भरवत तिरंगा फडकवला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)