विश्वविजयाचा ‘सूर्योदय’, 11 वर्षाचा वनवास संपला; हिंदुस्थानने वर्ल्डकप उंचावला

अटीतटीच्या फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या तोंडचा घास पळवत टी20 वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले. तब्बल 11 वर्षांचा वनवास संपला आणि टीम इंडियाने वर्ल्ड कप विजेतेपदावर आपले नाव कोरले असून दक्षिण आफ्रिकेची पाटी मात्र कोरी राहिली. टीम इंडियाने दिलेल्या 177 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली. मात्र शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवने मिलरचा अप्रतिम झेल पकडल्यामुळे सामन्याला कलाटनी मिळाली आणि टीम इंडियाने T20 World Cup 2024 च्या चमचमत्या ट्रॉफीवर आपले नाव कोरत इतिहास रचला.

बार्बाडोसमध्ये रंगलेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरली. सलामीला आलेली रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी फोडण्यात केशव महाराजाला यश आले. रोहित शर्मा (9 धावा) केशव महाराजाच्या गोलंदाजीवर स्वस्तात बाद झाला. मात्र पूर्ण वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीची शांत असलेली बॅट अंतिम सामन्यात तळपली आणि त्याने 59 चेंडूंमध्ये 76 धावांची तुफानी खेळी केली. विराटला अक्षर पटेल (47 धावा) आणि शिवम दुबे (27 धावा) यांनी मोलाची साथ दिली. त्यामुळे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचे आव्हान दिले होते.

आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. सात या धावसंख्येवर बुमराहने हेंड्रिक्सचा त्रिफळा उडवत दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर डि कॉकने मोर्चा सांभाळत 39 धावांची महत्वपूर्ण खेळी केली आणि संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अर्शदिप सिंगने बाद केले. त्यानंतर कर्णधार मार्करामला (4 धावा) सुद्धा अर्शदिपने पव्हेलियनचा रस्ता दाखवला. ट्रिस्टन स्टब्स (31 धावा) आणि क्लासेन (52 धावा) यांच्या वादळी खेळीमुळे काही वेळासाठी सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकला होता. मात्र अक्षरने स्टब्स आणि हार्दिक पंड्याने क्लासेनची विकेट घेत सामना पुन्हा टीम इंडियाच्या बाजूने वळवला. त्यानंतर आलेल्या मिलरने 21 धावांची खेळी करत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटच्या षटकात हार्दिकच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर  मिलरचा सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल पकडला आणि इथेच टीम इंडियाचा विजय निश्चित झाला.

महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2007 साली पहिले टी20 वर्ल्ड कप विजेतेपद पटाकवले होते. त्यानंतर आज (29 जून 2024) रोहित शर्माच्या नेतृत्वात दुसरा टी20 वर्ल्ड कप टीम इंडियाने जिंकला असून रोहित शर्मा आता कपिल देव आणि महेंद्र सिंग धोनीच्या पंक्तित जाऊन बसला आहे. 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वा टीम इंडियाने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात 2007 साली टी20 वर्ल्ड कप आणि 2011 साली वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर आज (29 जून 2024) रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने T20 World Cup 2024 जिंकला आहे.